गर्भवतींची खासगी रुग्णालयांत पायपीट; गरीब रुग्णांची आर्थिक परवड
पनवेलमधील आठ लाख लोकसंख्येला कमी दरात वैद्यकीय सेवा देणारे एकमेव ठिकाण असणाऱ्या सरकारी रुग्णालयात एकही सोनोग्राफी यंत्र नाही. वर्षांला सुमारे ३५० हून अधिक बाळांचा जन्म या रुग्णालयात होतो, मात्र गर्भवतीला सोनोग्राफीसाठी इतर रुग्णालयांमध्ये पाठवले जाते.
पनवेल शहरामध्ये टपाल नाका येथे एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात एकही सोनोग्राफी यंत्र नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. गर्भधारणेनंतर विविध टप्प्यांवर सोनोग्राफी करणे आवश्यक असते. गर्भामध्ये काही दोष तर नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी पाचव्या महिन्यात अॅनॉमली सोनोग्राफी आवश्यक असते. खासगी रुग्णालयात सर्वसाधारण सोनोग्राफीसाठी ५०० ते ७०० रुपये आकारले जातात, तर अॅनॉमली सोनोग्राफीसाठी अडीच ते तीन हजार रुपये आकारले जातात. सरकारने ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रांची सोय न केल्याने खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन महिलांना सोनोग्राफी करून घ्यावी लागते व त्याचा अहवाल येथील डॉक्टरांना दाखवावा लागतो.
सरकारच्या ‘जननी सुरक्षा योजना’ व ‘जननी शिशु सुरक्षा योजना’ या दोन्ही योजनांअंतर्गत गर्भवतींना सुमारे ७०० रुपये देऊन सोनोग्राफीची तपासणी व प्रवास खर्च सरकारी रुग्णालयातून दिला जातो. कोणत्याही खासगी रुग्णालयांचे सोनोग्राफीचे दर ठरलेले नाहीत. त्यामुळे रुग्णालयातच सोनोग्राफी यंत्र असल्यास महिलांची इतर रुग्णालयांत येण्या-जाण्याची पायपीट थांबेल, अशी अपेक्षा महिलावर्गातून व्यक्त केली जात आहे.
काही सामाजिक संस्थांनी पनवेल ग्रामीण रुग्णालयाला सोनोग्राफी यंत्र देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अद्याप कोणत्याही संस्थेने हे यंत्र दिलेले नाही. महाड येथे अशाच एका सामाजिक संस्थेच्या सहकार्यामुळे सोनोग्राफी यंत्र उपलब्ध झाले. एका यंत्राची किंमत सुमारे साडेसहा लाख आहे. यंत्र आल्यावर रेडिओलॉजिस्ट नियुक्त करण्यात येईल यंत्र देण्यास इच्छुक असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
– डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड</strong>