पूनम सकपाळ, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळी, अन्नधान्य,कांदा बटाटा, भाजीपाल्यासह फळांची घाऊक विक्री होते. पंरतु शहाळी मात्र घाऊकमध्ये दाखल न होता थेट ठाणेसह मुंबई उपनगरात विक्री होतात. मात्र आता एपीएमसी बाजारात ही शहाळे घाऊक दरात उपलब्ध होणार असून, शहाळे व्यापाऱ्यांना एपीएमसी बाजारात व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. बाजारात जागा उपलब्ध करून व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे.

वर्षभर शहाळ्यातील मधुर पाण्याला मागणी असते, मात्र उन्हाळ्यात विशेष पसंती दिली जाते. त्यामुळे वर्षभरच शहाळ्याचा व्यवसाय सुरूच असतो. नवी मुंबई, ठाणेसह मुंबई उपनगरात कर्नाटक, केरळ तसेच कमी प्रमाणात पालघर मधुन शहाळे विक्रीसाठी दाखल होतात. भाजीपाला , फळे तसेच इतर शेतमालाच्या विक्रीसाठी घाऊक बाजारपेठ उपलब्ध आहे. परंतु कर्नाटक, केरळ मधून दाखल होणारे शहाळे हे थेट किरकोळ बाजारात विक्री होतात असे मत विक्रेता राजू शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मात्र तरीदेखील शहाळे व्यापाऱ्यांना इतर शेतमालाच्या विक्री प्रमाणे बाजार फी (सेस)द्यावी लागते. केरळ, कर्नाटक मधून मुंबई उपनगरात शहाळे थेट विक्रीसाठी दाखल होत असले तरी वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत महिन्याला ५०० ते ६०० वाहन पासची नोंद होत असून महिन्याला १० ते १५लाख बाजार फी भरली जात आहे.

आणखी वाचा-१५० सीसीटीव्ही निरीक्षणातून अपहरणाचा छडा; ४ वर्षीय चिमुरडीची सुटका, आरोपीला अटक

संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव घेण्यात येणार असून यामध्ये सुरुवातीला फळ बाजार आवारातील बाजार समितीच्या ताब्यात असलेल्या गाळयांपैकी गाळा क्र. एम ७६२ (अर्धा) व एम ७९८ (अर्धा) हे गाळे शहाळी या शेतमालाचा व्यवसाय करण्याकरिता भाडे तत्वावर देण्याचे विचाराधीन होते. परंतु फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी शहाळी हे फळ बाजाराशी निगडीत नाही. त्यामुळे शहाळी या शेतमाल व्यवसायाकरीता मसाला मार्केट येथे जागा उपलब्ध असल्यास त्याचा विचार करावा असावं नमूद केले आहे. यावर प्रविण देशमुख यांनी नमूद केले की, शहाळी व्यापारी बाजार समितीकडे बाजार फी (सेसचा) भरणा करीत आहेत. त्यामुळे शहाळी व्यापाऱ्यांना इतर बाजार आवारात जागा देण्यात यावी. एपीएमसी बाजारात जागा उपलब्ध झाल्यानंतर शहाळी व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येणार आहे.

शहाळी व्यापारी थेट विक्री करीत आहेत, मात्र त्याचा सेस बाजार समितीला दिला जात आहे.त्यामुळे फळ बाजारात जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित होते. परंतु शहाळी हे फळ बाजाराशी निगडित नाहीत. शिवाय आधीच येथील व्यापाऱ्यांना जागा कमी पडत असून ओपन शेड मध्ये व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे बाजार समितीतील इतर जागेत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी असे सूचित करण्यात आले आहे. -संजय पानसरे, संचालक, फळ बाजार समिती

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now coconut water will be available at wholesale price mrj
Show comments