इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी माध्यमाच्या शाळा मागे पडत असल्याने जिल्हा परिषदेच्या अनुदानित प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, उरण शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सारडे शाळेत लोकवर्गणी आणि शिक्षकांच्या मेहनतीने झालेली डिजिटल शिक्षणाची सोय हा सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे. या डिजिटल रूपामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव येत असून दप्तराचे ओझेही बाद झाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतही वाढ होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता कोणतेही शासकीय अनुदान नसताना कोणी आपली जमीन तर कोणी श्रमदान करून गावोगावी प्राथमिक शिक्षणाची सोय केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या शाळांना शासकीय अनुदान मिळू लागले. मात्र शहरीकरणाचे आणि औद्योगिकीकरणाचे वरून वारे वाहू लागले आणि प्राथमिक शाळा बंद पडू लागल्या. यापैकी काही शाळांमध्ये तर गुरे ढोरे आणि मोकाट कुत्री वास्तव्य करीत असल्याचे चित्र आहे. यावर मात करण्यासाठी सारडे गावातील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी लोकवर्गणी काढून शाळेचा कायापालट करण्याचा निर्णय घेतल्याचे सामाजिक कार्यकर्ते ए. डी. पाटील यांनी सांगितले. ग्रामस्थांना हाक देताच दीड लाखांच्या आसपास निधी जमा झाला. गावातील कलावंतानी शाळेची मोफत रंगरंगोटी करून सुंदर वातावरण निर्माण केले. शाळेच्या वर्गात एक पडदा लावण्यात आला व प्रोजेक्टरद्वारे या पडद्यावर पेन ड्राइव्हमध्ये साठवलेला अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात झाली. या दृक्श्राव्य माध्यमामुळे विद्यार्थ्यांना सर्व विषय चटकन समजत असल्याचे लक्षात आले.

घटती विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी इतर प्राथमिक शाळांनाही डिजिटलायजेशन करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उरण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिले

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now sarde primary school is digital