लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबईतील महापालिकेच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील पार्किंगसाठी अखेर कंत्राटदार मिळाला आहे. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत वर्षाकाठी एक लाख ८०० रुपयांची भर पडणार आहे. मात्र दुसरीकडे अगोदरच नाटकांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत त्यात आता पार्किंगलाही पैसे द्यावे लागणार असल्याने रसिकप्रेक्षक नाराज आहेत.
शहरातील मध्यवस्तीत असलेले मनपाचे अद्ययावत विष्णुदास भावे नाट्यगृह प्रांगणात सुमारे १०० चारचाकी वाहने तर तेवढ्याच संख्येने दुचाकी उभी करण्याची जागा आहे. या जागेवर पार्किंग वसुलीसाठी असलेल्या कंत्राटदाराने करोना काळात नाटके बंद असतानाही मनपाच्या वसुलीस कंटाळून काम अर्धवट सोडले. त्यामुळे करोनानंतर नाट्यगृह पार्किंग कंत्राटासाठी अनेकदा निविदा काढण्यात आल्या. मात्र त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. दर खूप जास्त आणि त्यामानाने कमाई कमी असल्याने कोणीही उत्सुक नसल्याचे लक्षात आल्यावर दर कमी करण्यात आले.
आणखी वाचा-दिवाळी फराळासह आता रसदार आंबे, मलावी देशातून आंबे दाखल
या ऑनलाइन टाकण्यात आलेल्या कंत्राटला ठाण्यातील आटो फॅब यांनी प्रतिसाद दिल्यावर काम त्यांना देण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून पार्किंग वसुली त्यांनी सुरू केली आहे. चौकट : नवी मुंबईतील कंत्राट दाराने हे काम घेण्यास उत्सुकता दाखवली नाही या बाबत मनपातील एका कर्मचाऱ्याने माहिती देताना सांगितले की ऑक्टोबर ते मार्च दरम्यान उत्तम व्यवसाय होतो अन्य वेळेस नाटकांचे खेळ जास्त लागत नाहीत. त्यात राजकीय मेळावा सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात मात्र या कार्यक्रमाला येणारा एकही वाहन चालक पार्किंगचे पैसे देत नाही. मागितले तर दादागिरी वादावादी सारखे प्रकार होतात. ही माहिती नवी मुंबईकरांना आहे.
मराठी नाटकांना आता प्रेक्षक दाद देत नाही अशी ओरड होते मात्र प्रत्यक्षात महिन्यातून दोन नाटके जरी कुटुंबासमवेत पहिली तरी महिन्याचे आर्थिक गणित बिघडते म्हणून प्रेक्षक रोडवला आहे. त्यात आता पार्किंगला पैसे द्यावे लागणार आहेत. वर्षाला १ लाख ८०० म्हणजे महिन्याला केवळ ८ हजार ४०० रुपये मनपाच्या तिजोरीत भर पडणार. साडेचार हजार कोटींचा अर्थसंकल्प मानणाऱ्या पालिकेच्या तिजोरीत ही रक्कम पडली नाही तर फारसा फरक पडणार नाही मात्र रसिक प्रेक्षकांना फरक पडतो. अशी प्रतिक्रिया माधुरी फसळकर या महिला रसिकाने दिली.