जगदीश तांडेल, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : विकासाच्या नावाने उरणच्या परिसरातील नैसर्गिक पाणथळीची ठिकाणे नष्ट होऊ लागल्याने नोव्हेंबर ते एप्रिल, मे या कालावधीत विविध देशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या फ्लेमिंगोसह इतरही जातींच्या पक्ष्यांच्या संख्येत ही घट झाली आहे. ही घट लक्षणीय असून या परिसरात येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्ष्यांपैकी आता त्यांची संख्या शेकड्यावर आली आहे. असा दावा पर्यावरवाद्यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत येथील पाणथळ क्षेत्राचे संरक्षण करण्याची मागणी ज्येष्ठ पर्यावरवादी बी. एन. कुमार यांनी केली आहे. पक्षी संख्या कमी झाल्याने उरण परिसरात येणाऱ्या पक्षी प्रेमीना व अभ्यासकांना ही याचा फटका बसत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई नंतर पक्ष्यांचं स्थान ठरलेली उरणची पक्षीस्थाने ओस पडत आहेत.

उरण हा समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर वसलेले आहे. त्यामुळे समुद्र आणि खाडी किनारी येणाऱ्या चिखलातील मासे, किडे हे पक्ष्यांचे खाद्य आहेत. यांच्या शोधत हजारो मैलाचा प्रवास करून विविध जातीचे पक्षी उरणच्या किनाऱ्यावरील पाणथळ ठिकाणी येतात. समुद्राच्या भरतीच्या वेळी येणारे पाणी आणि त्यातून आलेले मासे ही या पाणथळ जागांची खासीयत आहे. यासाठी फ्लेमिंगो सारखे हजारो पक्षी येत होते. मात्र उरण मधील अनेक पाणथळ जागा या मातीच्या भरावाने बुजविल्या जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणा वरील पाणथळी वर येणाऱ्या समुद्राच्या पाण्याला अडथळा निर्माण केला जात आहे. किंवा हे पाणी बंद केले जात आहे. त्यामुळे उरण मधील पाणथळी कोरड्या झाल्या आहेत. परिणामी ज्या कारणासाठी पक्षी पाणथळी वर येत होते. तेच नष्ट होत असल्याने पक्षी संख्या रोडावली आहे. यानिमित्ताने येथील पक्षाचे निरक्षण व अभ्यास करण्यासाठी देशातील विविध भागातून येणारे पक्षी अभ्यासकांनी या बाबत चिंता व्यक्त केले आहे. पाणथळी आवश्यक : उरण मधील निसर्ग व पर्यावरण याचा सुरू असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी पाणथळी पुन्हा एकदा जिवंत केल्या पाहिजे अशी मागणी उरणच्या पक्षी प्रेमींनी केली आहे. त्यामुळे येथील जैवविविधता ही टिकून राहील असे मत पर्यावरण कार्यकर्ता निकेतन ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

आणखी वाचा-नवीन वर्षात शिळफाटा रस्त्यावरून कोंडी मुक्त प्रवास; ऐरोली-काटई उन्नत मार्ग, शिळफाटा पुलांची कामे अंतीम टप्प्यात

खाडीतील मासळी संकटामुळे पक्षावर उपासमार : समुद्रातून खाडीत मासळी येण्याचे नैसर्गिक मार्ग मातीचा भराव करून बंद करण्यात आले असून त्यामुळे खाडीतील मासळीचे प्रमाण कमी झाल्याचा मासळी खाद्य असलेल्या हजारो पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे पक्षाची आदिवासी असलेले पाणथळे ही नष्ट होत आहेत. याचाही परिणाम पक्ष्यांच्या जीवनावर होऊ लागला आहे. खाद्य शोधण्यासाठी पक्ष्यांनी भ्रमंती वाढली आहे.

बहुतांशी पक्ष्यांचं खाद्य हे मासळी आहे. त्यामुळे समुद्र व खाडी किनाऱ्यावर पक्षी आपल्या खाद्याच्या शोधात हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येतात. मात्र खाडीतील पाण्याचे प्रवाह बंद होत आहेत. त्याचप्रमाणे मासळी च्या प्रजनन चक्राची साखळी खंडीत केली जात आहे. याचा परिणाम मासळीचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे. या मासळी दुष्काळी स्थिती मुळे उरणच्या पाणजे, भेंडखळ आणि जासई व इतर ठिकाणी येणारी फ्लेमिंगो व विविध जातींचे पक्षी यांची संख्या रोडावू लागली आहे. काही ठिकाणी पाणथळ शिल्लक असली तरी पाण्यात मासळीच नसल्याने पक्ष्यांची उपासमार वाढली आहे. एकीकडे खाद्य नाही तर दुसरीकडे उष्माघात याने पक्षी जीवनच धोक्यात आले आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी महत्वाच्या असलेल्या पक्ष्यांचे संरक्षण हे ऐरणीवर आले आहे. त्यामुळे येथील विकासाच्या नावाने सुरू असलेली निसर्गाला नष्ट करणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवण्याची मागणी पर्यावरणप्रेमीनी केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of foreign birds visiting uran decreased due to destruction and drying up of water bodies mrj