नवी मुंबई : नवी मुंबई शहर नियोजनबद्ध वसवलेल्या सिडकोने करोडो किंमतीचे भूखंड विकण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेने विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या भूखंडाची विक्री केल्याचे चित्र असताना दुसरीकडे पालिकेच्या मालकीच्या असलेल्या करोडो रुपयांच्या भूखंडाकडे सिडको दुर्लक्ष करत आहे.
शहरात अनधिकृत बांधकामे व बेकायदा धार्मिक स्थळे वाढत असताना पालिका व सिडकोच्या दुर्लक्षामुळे सिडकोच्या भूखंडावर बेकायदा नर्सरींची हातपाय पसरी वाढतच चालल्याचे चित्र आहे. शहरातील विविध विभागात वाढणाऱ्या या बेकायदा रोपवाटिकांनी आता सिडको व पालिकेलाच आव्हान दिल्याचे चित्र असून सीवूड्समधील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या मोंक्याच्या भूखंडावरही नर्सरीचालकांची हातपाय पसरी सुरू असताना पालिकेचे व सिडकोचे अतिक्रमण विभाग डोळ्यावर पट्टी बांधून दुर्लक्ष करत आहे. याच्यापाठीमागे अधिकाऱ्यांची की स्थानिकांची वसुली सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा – रायगडात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पारसिक हिलच्या पायथ्याशी आग्रोळी गावाजवळ असलेल्या जल उदचन केंद्राच्या भिंतीचा व मुख्य जलवाहिनीचा आधार घेत बेकायदा रोपवाटीकेवर पालिकेने कारवाई केली होती. परंतु, पावसाळ्यातील भूछत्र्यांप्रमाणे सिडकोच्या भूखंडावरील नर्सरीही कारवाईनतर पुन्हा थाटल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिका व सिडकोचा अतिक्रमण विभाग करतो तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबईत शहरभर बेकायदा रोपवाटीकांनी सिडकोच्या व पालिकेच्या मोकळ्या जागा गिळंकृत करून फुटपाथ ताब्यात घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सिडकोने कुंपन घातलेल्या भूखंडावरही ताबा मिळवून बेकायदा रोपवाटिका स्थापल्या आहेत. सिडकोच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेकडे सिडकोचा कानाडोळा होत आहे. तर बेकायदा नर्सरींनी बसथांब्यांनाही विळखा घालायला सुरवात केली आहे. सिडकोच्या मालकीच्या अंगणात, तसेच पदपथावर रोपट्यांची विक्री करण्याचा बेकायदा धंदा अधिकाऱ्यांच्या छायेत जोमात सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सानपाडा, नेरुळ, बेलापूर, सीवूड्स, कोपरखैरणे विभागात अनेक ठिकाणी बसथांब्याभोवतीही नर्सरी थाटल्या आहे. सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये म्हणून भूखंडांभोवती तारेचे संरक्षित कुंपन घातले आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत सिडकोचे कोटींचे भूखंड सिडकोच्या ताब्यात आहेत. कोटींची मालमत्ता सिडकोच्या मालकीचा असून कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येणार नसल्याचे फलक या भूखंडावर सिडकोने लावले आहेत. परंतु, शहरातील अनधिकृत रोपवाटीकाधारकांनी कुंपन घातलेल्या भूखंडामध्येच अतिक्रमण करून अनधिकृत रोपवाटीका सुरू केल्या आहेत.
शहरात सिडको, महापालिका, एमआयडीसीच्या सार्वजनिक भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. शहरातील फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी नसून अनधिकृत फोरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्यामुळे शहरातील पालिका, सिडको, एमआयडीसी या तिन्ही आस्थापनांच्या मोक्याच्या जागा व भूखंड अनधिकृत रोपवाटीकाधारकांनी, तसेच भूमाफीयांनी व्यापलेल्या आहेत.
हेही वाचा – रायगड : वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका उद्योग क्षेत्राला
अतिक्रमणांवर कडक कारवाई होण्याऐवजी त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, या अतिक्रमणाचे पेव पालिकेच्या व सिडकोच्या अंगणात येऊन पोहचले आहे. तरी पालिका व सिडकोला त्याचे काही सोयरसुतक नाही. याबाबत पालिका व सिडकोने तात्काळ अशा बेकायदेशीरपणे जागा अडवून अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
वसुलीचा धंदा?
नवी मुंबई शहरात ज्या विभागात या मोकळ्या भुखंडावर अतिक्रमण केलेले आहे, तेथे सिडको व पालिकेचे संबंधित अधिकारी महिन्याकाठी वसुली करत असल्यानेच त्यांना अभय दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच, सिडकोच्या भूखंडाच्या आडून वसुलीचा धंदा काही अधिकारी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.