एपीएमसीमधून फळ चाचणीसाठी एफडीआयच्या प्रयोगशाळेत
हापूस आंबा पिकविण्यासाठी गेली अनेक वर्षे वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाइड प्रक्रियेला राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी बंदी घातल्याने हापूस पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वीकारलेल्या ‘इथिलिन वायू’ प्रक्रियेलाही राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी तुर्भे येथील फळ बाजारातून अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीआय) ठाणे विभागाने इथिलिन वायूद्वारे पिकविण्यात येणाऱ्या काही हापूस आंब्यांच्या पेढीवर छापा टाकला. यातील काही आंबे चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.
कोकणातून मोठय़ा प्रमाणात येणारा कच्चा हापूस आंबा पिकविण्यासाठी व्यापारी व कोकणात बागायतदारही गेली अनेक वर्षे चुन्याची पुडी (कॅल्शियम कार्बाइड) बंद पेटीत ठेवत होते. चुन्यातील तीव्र उष्णतेमुळे काही दिवसांत हापूस पिवळसर रंग धारण करीत होता; मात्र आंबा पिकविण्याच्या या पद्धतीला आक्षेप घेण्यात आला.
अशा प्रकारे पिकविलेला हापूस कर्करोगाला आमंत्रण देणारा ठरेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली व बंदी घालण्यात आली.
बोरिवली येथे अशा पद्धतीने पिकविण्यात आलेल्या हापूसच्या हजारो पेटय़ा जप्त केल्या.
हापूस पिकविण्यासाठी पर्यायी कायदेशीर प्रक्रिया म्हणून परदेशी कंपनीने बाजारात आणलेल्या इथ्रिल रसायन आणि इथिलिन वायूचा वापर व्यापाऱ्यांनी सुरू केला. इथ्रिल एक लिटर पाण्यात मिसळून त्याचे पाणी हापूस आंब्यावर मारल्यानंतर ते झाकून ठेवल्यानंतर काही दिवसांत हापूस आंबा पिकतो.
प्रक्रियेनंतर आंब्यावर मारलेले हे रसायन शिल्लक राहात नाही, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे. या इथ्रिलपासून इथिलीन वायू तयार होत असल्याने हा हापूस आंबा पिवळाधमक होत असल्याचे दिसून येते. याला अन्न व औषध प्रशासनाने आक्षेप घेतला आहे.
मंगळवारी काही व्यापाऱ्यांच्या पेढय़ांवर छापा टाकून हापूस प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा