लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : शहरातील डीपीएस तलावानजीक पाच फ्लेमिंगोंच्या गूढ मृत्यूनंतर ‘बीएनएचएस’, मॅन्ग्रोव्ह सेल, पालिका अधिकाऱ्यांनी तलावाला भेट दिली. पथदिव्यांचा प्रखर झोत, खाडीतील प्रदूषित पाणी, तलावातील कोरड्या जागांमुळे फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याचे पाहणीनंतर म्हटले.
याबाबतचा सविस्तर पाहणी अहवाल मॅन्ग्रोव्ह सेलचे प्रमुख व्ही. एस. रामाराव यांना सादर केला जाईल, असे विभागीय वनक्षेत्र अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले. तलावात येणारे पाण्याचे स्राोत बुजवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार आणि सेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्ह समुहाच्या रेखा सांखला या वेळी उपस्थित होते. प्रखर झोतामुळे या पक्ष्यांची दिशाभूल झाली असावी आणि ते रस्त्यावर उतरले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मागील वेळी साईन बोर्डला धडकून फ्लेमिंगो मरण पावले होते असे निरीक्षण बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत यांनी नोंदवले. तसेच पालिकेला पामबीच मार्गापासून डीएसपी शाळेच्या दिशेने आणि नंतर नेरुळ जेट्टी रस्त्याजवळील पथदिवे बदलण्याची सूचना केली आहे.
आणखी वाचा-उरण : रानसई धरणाच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणी वाया
जखमींपैकी दोन फ्लेमिंगो मृत्यूमुखी
डीपीएस तलावाजवळ गुरुवारी ५ फ्लेमिंगोंचा मृत्यू व ७ फ्लेमिंगो जखमी झाले होते. आज उपचारादरम्यान जखमींपैकी आणखी दोन फ्लेमिंगोचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकूण १० फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याने पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. उर्वरित ५ जखमी पक्ष्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राडारोडाबाबत पाहणी
उलवे वहाळ गाव परिसरात कांदळवन जागेवरील राडारोडा बाबत मंडल अधिकाऱ्यांनी पाहणी केली. याबाबत अॅड. प्रदीप पाटोळे यांनी तहसलीदारांकडे तक्रार केली होती.
आणखी वाचा-उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू
सिडकोने या तलावात येणाऱ्या पाण्याचा स्राोत बंद केला आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या मृत्यूला सिडको कारणीभूत आहे. तलावात जाळे टाकल्यानेही त्यात अडकून पक्षी जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय फ्लेमिंगो दिनीच फ्लेमिंगो वाचवण्यासाठी आम्हाला लढा द्यावा लागत आहे हे अत्यंत खेदजनक आहे. -रेखा साखला, सेव्ह फ्लेमिंगो व मँग्रोज संस्था प्रमुख
फ्लेमिंगोंच्या मृत्यूमुळे सीवूड्स येथील डीपीएस तलाव व परिसराची आज प्रत्यक्ष पाहणी केली असून त्याबाबतचा सविस्तर अहवाल मँग्रोव्ह सेलचे प्रमुख व्ही. रामाराव यांना दिला जाणार आहे. -दीपक खाडे, मँग्रोव्ह सेलचे मुंबई विभागीय वनक्षेत्र अधिकारी