पनवेल : पनवेल नगरपालिकेत सिडको वसाहती व २९ गावांचा समावेश करून पाच वर्षांपूर्वी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली आहे. ही गावे व वसाहती आजही पायाभूत सुविधा व पाणीप्रश्नाबाबत त्रस्त असताना आता पनवेल महापालिकेत करंजाडे व उलवा या आणखी दोन सिडको नोडचा समावेश करण्याची मागणी सत्ताधारी भाजपकडून होत आहे. ही मागणी भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी रविवारी जाहीर कार्यक्रमात केली आहे.
या वसाहतींप्रमाणे आदई व सुकापूर या ग्रामपंचायतींचा परिसर पालिका हद्दीलगत आहे. येथील झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण पाहता ही गावेही पालिकेत समाविष्ट होतील का याबाबत चर्चा सुरू आहे. पनवेल नगर परिषदेचा विस्तार करून कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, तळोजा पाचनंद, नावडे या सहा वसाहती आणि २९ गावांचा परिसर जोडून २०११ च्या जणगणनेनुसार ५ लाख ११ हजार लोकसंख्येची महापालिका स्थापन करण्यात आली. सध्या या महापालिका क्षेत्राची लोकसंख्या नऊ लाखांवर गेली असण्याची शक्यता आहे. उलवा वसाहतीमध्ये भाजपचे नेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरातील ९३४ स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला, यावेळी ठाकूर यांनी देशभरातील विविध प्रांतांमधील रहिवाशी उलवे येथे वास्तव्यास आल्याने त्या रहिवाशांनी स्थानिकांसोबत एकोपा ठेवताना संबंधित परिसराची लोकसंख्या ध्यानात घेता करंजाडे व उलवा हे दोनही नोड पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी भाजप करीत असल्याची घोषणा केली. ठाकूर यांच्या या मागणीच्या घोषणेमुळे राजकीय व सामाजिक स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. कोटसध्या तरी सिडकोने करंजाडे नोडचा संपूर्ण विकास केलेला नाही. तोपर्यंत तरी आम्हा करंजाडेवासीयांचा समावेश पनवेल महापालिकेत करू नये. पालिकेतील मालमत्ता कराचे दर परवडणारे नाहीत.रामेश्वर आंग्रे, सरपंच, करंजाडे गाव कोटआमचा पनवेल महापालिकेच्या समावेशाला विरोध आहे. सध्या उलवे नोडमधील विकासकामांमुळे वहाळ ग्रामपंचायतीला वर्षांला पाच ते सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्कापोटी मिळतात. यामुळे गावात सीसीटीव्हीपासून ते रस्ते व स्वच्छता यांवर खर्च करून आदर्श गावाकडे गावाची वाटचाल सुरु आहे. मात्र पनवेल पालिकेमधील गावांची स्थिती सध्या बिकट आहे. आमचा विरोध पालिकेला नसून पालिकेच्या समावेशनामुळे निर्माण होणाऱ्या इतर सामाजिक समस्यांना आहे. राजेंद्र पाटील, शेकापचे स्थानिक नेते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा