पनवेल : जेमतेम दहा वर्षांचे वयोमान असूनही झपाट्याने होणाऱ्या नागरिकरणामुळे पायाभूत सुविधा आणि नियोजनाच्या जटील अशा समस्यांना सामोरे जाणाऱ्या पनवेल महापालिकेने मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचा रतीब मांडत तसेच नाविण्यपूर्ण उपक्रमांची पेरणी करत नव्या वाटचालीचा संकल्प सोडला आहे. येत्या चार वर्षांत उत्तम असा पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस आखणी, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांसाठी भरीव आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील मुळ शहर आणि आसपासची उपनगरे रहाण्यासाठी संपन्न होतील अशा पद्धतीच्या प्रकल्पांचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी यावेळी दिली.

पनवेल महापालिकेचे तीन हजार ८७३ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढाल असलेला आणि २७ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प आज आयुक्त चितळे यांनी सादर केला. महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे अंदाजपत्रकाची ही प्रत सादर केली. देशातील एक पर्यावरण पूरक आणि हिरवेगार शहर ही पनवेलची ओळख यापुढेही कायम राहील अशापद्धतीचा संकल्प हा अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांनी व्यक्त केला. पनवेल आणि आसपासच्या शहरातील उपनगरांमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न अनेकदा गंभीर रुप धारण करत असतो. या पार्श्वभूमीवर आयुक्त चितळे यांनी देहरंग धरणाची उंची आणखी २० मीटरने वाढविण्याची घोषणा यावेळी केली. तसेच बाळगंगा प्रकल्पातील पाणी पनवेलकरांना मिळेल अशापद्धतीची आखणीही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल महापालिका हद्दीतील उपनगरे पुढील चार वर्षात पाणी पुरवठ्याच्या आघाडीवर स्वयंपूर्ण होतील, अशापद्धतीची पाउले उचलली जात असल्याचे चितळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

उत्पन्न वाढीवर भर, जीवनमान सुसह्य करण्याचा संकल्प

यंदाच्या अर्थसंकल्पात पनवेल महापालिका हद्दीत रहाणाऱ्या नागरिकांचे जीवनमान सुसह्य होईल अशापद्धतीने प्रकल्पांची तसेच योजनांची आखणी करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे उत्पन्न गाठण्यात महापालिकेस अपयश आले होते. यावर्षी करदाते त्यांना लावलेला कर स्वत: तपासू शकतात तसेच व्यवसाय परवाने देखील घरबसल्या मिळू शकतात अशापद्धतीच्या ॲपची व्यवस्था महापालिकेने केली आहे. यावर्षी उत्पन्न वाढीसाठी महापालिका वाहनतळाचे स्वतंत्र धोरणही राबवेल असेही चितळे यांनी स्पष्ट केले. महापालिका पाच ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण

सद्यस्थितीत महापालिकेचे २० दवाखाने ग्रामीण तसेच शहरी भागात सुरु अहोत. असे असले तरी महापालिकेचे मोठे एकही रुग्णालय अजूनही कार्यान्वित झालेले नाही. सार्वजनिक व्यवस्थेचा भार उपजिल्हा रुग्णालयावर पडतो. त्यामुळे महापालिका येत्या काळात ४५० खाटांचे माताबाल रुग्णालय सुरु करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासंबंधीची निवीदा प्रक्रिया येत्या दहा दिवसात सुरु केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक धोरण

पनवेल शहरात पालिकेच्या १० शाळंमध्ये १२०० विद्यार्थी शिकतात. ९ वर्षात पालिकेने ग्रामीण भागात व सिडको क्षेत्रात महापालिकेच्या शाळा सुरू केल्या नाहीत. जिल्हापरिषदेच्या ५१ शाळांमध्ये सूमारे १० हजार विद्यार्थी शिकतात. अजून या शाळांचे हस्तांतरण रखडले आहे. आयुक्त चितळे यांनी शाळांचे मुल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शाळांच्या इमारती वेगवेगळ्या यंत्रणेच्या मालकीच्या असल्याने शाळेंच्या जमीनीची किमत किती, बांधकामाचे मुल्यांकनासाठी नगर रचना विभागाचे सह संचालकांची नियुक्ती केल्याची माहिती दिली. यासंदर्भात लवकरच बैठकीमध्ये मुल्यांकनाचा मसुदा जिल्हापरिषदेला दिल्यानंतर हस्तांतरण प्रक्रिया होईल. या शाळेतील शिक्षणसेवकांची तरतूद आकृतीबंधात करण्याची प्रक्रिया पालिकेची सुरू असल्याचे सुद्धा आयुक्त म्हणाले. गाढी नदीला येणा-या पुरामुळे पनवेल शहरात पाणी शिरु नये यासाठी पुर प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि पंपींग स्टेशनसाठी १७. ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‘वेस्ट टू एनर्जी’

कचरा निर्मूलनासाठी पनवेल महापालिकेने एक पाऊल पुढे उचलले आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प पनवेल महापालिका आणि सिडको मंडळ हे संयुक्त भागीदारातून उभारत आहेत. हा प्रकल्प घोट (तळोजा) येथील सध्या सिडकोच्या सुरू असलेल्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये उभारण्यात येईल. ‘वेस्ट टू एनर्जी’ असे या वीज निर्मिती प्रकल्पाचे नाव असून ६५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी पालिकेने १० कोटी रुपयांची तरतूद सध्या अंदाजपत्रकात केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेला किती अनुदान मिळते याची चाचपणी करुन पालिकेला भविष्यातील निधी उभारणार असल्याची माहिती पालिका आय़ुक्त चितळे यांनी दिली.

ठळक वैशिट्ये

  • पनवेलकरांच्या आरोग्यासाठी ३४६ कोटी रुपयांचे हिरकणी रुग्णालय पालिका नौपाडा गावासमोर बांधणार आहे. पुढील आर्थिक वर्षात १७ कोटी ५० लाखांची तरतूद या रुग्णालयासाठी केली आहे. २३९ कोटी बांधकाम आणि १०७ कोटी रुग्णालयाचे वैद्यकीय उपकरण व साहित्यासाठी लागणार आहेत.
  • कळंबोलीतील धारणतलावातील स्वच्छता आणि सुशोभिकरणासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • पनवेलकरांना पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पालिकेने धोरण आखले असून उदंचन केंद्रातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण दोन ठिकाणी पालिका करणार आहे. कामोठे येथील १५ दश लक्ष लीटर क्षमतेच्या केंद्रावर पुनर्वापरायुक्त पाण्यासाठी ४० कोटींची तरतूद केली आहे.
  • विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीसाठी पालिकेने ८३ कोटी रुपयांची उपाययोजना केली आहे. शैक्षणिक सोयीसुविधा नवीन शाळाबांधल्या जातील.
  • पनवेलमध्ये दैनंदिन बाजारतळ उभारण्यासाठी ३५ विविध भूखंड सिडकोने पालिकेला दिले आहेत. ८० कोटी रुपये यासाठी खर्चाची तरतूद
  • कळंबोली येथे ५० खाटांचे संसर्ग रुग्णालयासाठी ७० कोटी रुपये खर्च होणार असून यंदाच्या आर्थिक वर्षात १० कोटींची तरतूद केली आहे.
  • पनवेलमध्ये ८१ स्मशानभूमीत सुशोभिकरण करणे तसेच वायू प्रज्वलित शवदाहिनी, २५ टक्के सरपणाच्या लाकडांचा १०० टक्के परिणामांसाठी आधुनिक स्मशानभूमी
  • खारघरमध्ये नाट्यगृह आणि नगरवाचन मंदिर, वाचनालय १४ कोटींची तरतूद
  • बांधकामातून निघणारा राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पासाठी ७ कोटींची तरतूद

खारघरमध्ये तारांगण प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने १८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. पनवेल महापालिकेने तारांगणासाठी ३० कोटी रुपयांचा बांधकाम खर्चाची तरतूद केली आहे. खारघर येथील स्कायवॉक येथे सोलर यंत्रणा पालिका उभारणार आहे. त्यामधून वीजेवरील वाहनांचे चार्जिंग स्थानक उभारण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद शहरात वाहनतळांचा अभाव असल्याने पालिका पाच ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारणार आहे. तीन ठिकाणचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

सुरू असलेली महापालिकेची कामे

  • महापालिकेचे प्रशासकीय भवन ‘स्वराज्या’चे बांधकाम मे महिन्यात पूर्ण होणार आहे. पुढील आर्थिक वर्षात या भवनातील अंतर्गत सजावट व इतर खर्चासाठी १५८ कोटी रुपयांची तरतूद
  • सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे रस्त्यांसाठी २७६ कोटी रुपये तरतूद
  • शहरातील प्रत्येक मुख्य चौक आणि रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यासाठी १०७ कोटी रुपये
  • ८० किलोमीटरचे डांबरीकरणाचे उदिष्ट पुढील आर्थिक वर्षात असल्याने १११ कोटी रुपये
  • खारघर येथील कोपरा येथील सेक्टर १० मध्ये सामाजिक सभागृहासाठी २० कोटी रुपये
  • महापौर निवास स्थानासाठी १७ कोटी ५० लाखांची तरतूद
  • खांदा कॉलनी येथील सेक्टर ८ येथील माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन यासाठी १३ कोटी ५४ लाखांची तरतूद
  • अग्निशमन दलासाठी वाहन आणि हवेतील धुलीकण नियंत्रण वाहनांसाठी ११ कोटी रुपये
  • बेघरांसाठी रात्रनिवारा, कळंबोली पुण्यश्लोक राजमाता आहित्याबाई होळकर सभागृहासाठी १० कोटी रुपये

Story img Loader