पनवेल : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल दौऱ्यासाठी बुधवारी येणार असल्याने शहरातील मुख्य चौकातील रस्ता डांबराने तुळतुळीत केल्यामुळे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बुधवारी उभे राहिले. यावेळी शेकाप पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये रस्त्यात खड्डे पडले आणि सध्या डांबराने तुळतुळीत केलेले रस्ते अशी छायाचित्रे होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पनवेलनगरीत नेहमी यावे अशी विनंती करण्यासाठी हे पदाधिकारी एकवटल्याची माहिती शेकाप पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शेकापच्या या अचानक केलेल्या निषेध आंदोलनाची चर्चा पनवेलमध्ये रंगली होती. एकीकडे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे येणार म्हणून भाजपाकडून ढोलपथकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दणदणाट सुरू होता. तर दूसरीकडे याच दणदणाटामध्ये शेकापचे पदाधिकारी निषेध व्यक्त करत होते. अचानक पुकारलेल्या निषेधाची दखल पनवेल शहर पोलिसांनी घेऊन निषेध व्यक्त करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही मिनिटांत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पनवेलमध्ये प्रवेश झाला.

हेही वाचा – नवी मुंबई : घटना जूनमधील गुन्हा दाखल ऑक्टोबरमध्ये, पीडित व्यक्तीचे दोन हात गेले… 

पनवेल, उरण आणि कर्जत हे तीनही विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येत असल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेलमध्ये भाजपाच्या पदाधिकारी व बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आले आहेत. देशात ४०० जागांवर आणि राज्यात ४५ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रत्येक मतदारसंघात दौरा करत आहेत. बुधवारी होत असलेल्या दौऱ्यासाठी पनवेल महापालिकेने ज्या रस्त्यावरून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे आगमन होणार आहे तो रस्ता रातोरात तुळतुळीत केला होता. शेकापचे माजी नगरसेवक गणेश कडू यांनी पनवेल पालिकेचे आयुक्त हे भाजपाचे असल्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप केला. आयुक्त गणेश देशमुख यांनी गणेशोत्सवामध्ये सामान्य नागरिकांसाठी रस्ते सुधारले असते तर बरे झाले असते अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली.

शेकापच्या अचानक पुकारलेल्या निषेध आंदोलनामध्ये डाॅक्टर सुरेखा मोहकर, अनुराधा ठोकळ, अवधुत पाठारे, कॉंग्रेस पक्षाचे मेघराज म्हात्रे, शिवसेनेचे प्रवीण जाधव असे पदाधिकारी निषेध व्यक्त करताना दिसले. आंदोलनाच्या ठिकाणी ढोल पथकाचा गजर सुरू असताना झालेले आंदोलन लक्षवेधक ठरले. माजी नगरसेवक कडू यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना गावातील गावदेवी मंदिराजवळील रस्त्यावरील खड्डे पालिका प्रशासनाला दिसत नाहीत. मात्र भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आग्रहामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आगमनासाठी रस्ते तातडीने दुरुस्त केल्याचा आरोप केला.

हेही वाचा – उरणच्या हवेच्या प्रदूषणाची मात्रा वाढली, देशात पुन्हा पहिल्या स्थानावर, मंगळवारी ए.क्यू.आय. ३४८ वर

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने शेकापने अचानक खड्डे दिसणाऱ्या रस्त्यांची छायाचित्रे दाखविण्यासाठी आंदोलन हाती घेतले. पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन तेथील शेकाप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. काही मिनिटांत आंदोलकांना पोलीस गाडीतून ठाण्यात नेण्यात आले. काही मिनिटांत अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमदार प्रशांत ठाकूर आणि अपक्ष आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर आले. त्यानंतर काही मिनिटांत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हेसुद्धा आले.

जल्लोषात बावनकुळे यांचे स्वागत

पनवेलनगरीत भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी भाजपाच्या पनवेलच्या समितीने केली होती. दोन वेगवेगळी ढोल पथके, फटाके, मुलींच्या लेझीम पथकासह डीजेचा आवाज अशा विविध माध्यमांतून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुपारी बारा वाजता दणदणाट सुरू होता. चौकातील मुख्य हायमास्टच्या दिव्याचा आधार घेऊन पताकांची माळ लावण्यात आली होती. स्थानिक आणि वाहतूक पोलीस यावेळी तैनात होते. सकाळपासून तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात जमा होण्यास सुरुवात झाली होती. कार्यकर्त्यांना चहापानची सोय, वाहन पार्किंग या सर्व व्यवस्थेच्या नियोजनासाठी आमदार ठाकूर, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते परेश ठाकूर, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी हे दिसत होते. नूकतेच केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी आमदार ठाकूर यांच्या मंत्रिपदासाठी आशावाद व्यक्त केला होता. मात्र भाजपाचे पक्षश्रेष्ठी ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन आमदार ठाकूर यांनी यावर अधिक बोलणे टाळले.