उरणसह नवी मुंबईतील तेल कंपन्यांच्या तेलवाहिन्या तसेच टँकरमधून मोठय़ा प्रमाणात तेलचोरीच्या घटना घडल्या असून यातील तीन फरार आरोपींना पोलिसांनी सापळा रचून नुकतीच अटक केली. या तिन्ही आरोपींना रायगड, ठाणे तसेच नवी मुंबई जिल्ह्य़ातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.
शफीक अहमद खलील अहमद खान (४५), संतोष रघुराज सिंग (४२) व रामनारायण सुभेदार सिंग (५३) अशी या तिघांची नावे आहेत. जेएनपीटी, ओएनजीसी, इंडियन ऑइल तसेच इतर तेल कंपन्यांच्या साठवणूक टाक्या तसेच तेल वाहिन्यांना छिद्रे पाडून किंवा टॅप लावून डिझेल, पेट्रोल तसेच अतिज्वलनशील नाफ्त्याची चोरी केली जात होती. उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र गलांडे, अभय महाजन व बी. एम. आव्हाड यांच्या पथकाने या तिघांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. त्यानंतर रायगड, ठाणे व नवी मुंबईतून त्यांना तडीपार करण्यात आले.
चोरीच्या अन्य घटनेत जासई येथील एका घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी अब्दुल कलीम मकबुल अहमद खान व समिम मुल्ला अजमुल्ला खान या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून संबंधित ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
रानसई येथील एका फार्म हाऊसमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी नीलेश परशुराम आरेकर, सुनील तानाजी मोरे या दोघांना उरण पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे शहरातील एक दुचाकी, दोन ट्रेलर्स चोरी करणाऱ्यांनाही अटक करून पोलिसांनी उरणमधील अनेक गुन्ह्य़ांची उकल केली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2015 रोजी प्रकाशित
तेल, नाफ्ताचोरांवर तडीपारीची कारवाई
उरणसह नवी मुंबईतील तेल कंपन्यांच्या तेलवाहिन्या तसेच टँकरमधून मोठय़ा प्रमाणात तेलचोरीच्या घटना घडल्या
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 29-09-2015 at 06:58 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil theft