संतोष जाधव
सतरा प्लाझा ते कोपरी परिसरातील चित्र; १२५ फलक नावापुरते
नियोजित नवी मुंबई शहरात वाहनचालकांच्या बेपर्वा बेशिस्तीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यात पार्किंगच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. महत्त्वाच्या पामबीच मार्गावर अरेंजा कॉर्नर ते सतरा प्लाझा परिसरात नो पार्किंगमध्ये पार्किंग केले जात असून धक्कादायक बाब म्हणजे विक्रीसाठीच्या जुन्या गाडय़ा येथे लावल्या जात आहेत.
बिकानेर चौक ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत पालिकेने नो पार्किंगचे जागोजागी १२५ फलक लावले असतानाही हा प्रकार होत असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
या परिसरात जुन्या विक्रीसाठीच्या वाहनांची रांगच रांग लागलेली पाहायला मिळत आहे. पामबीच हा मार्ग सातत्याने रहदारीचा रस्ता आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यावरून कोपरीमार्गे पामबीच मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मोठमोठय़ा गाडय़ांची विक्रीची दुकाने आहेत. तर कोपरी पेट्रोल पंपापासून ते उड्डाणपुलापर्यंत अनेक जुन्या गाडय़ांची विक्री करणारी दुकाने आहेत. त्याची वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने बेकायदा पार्किंगचे प्रमाण वाढत आहे. पालिकेने कोपरी परिसरात पामबीच मार्गालगत लोखंडी बॅरिकेड्स लावले आहेत, तेही बिनकामाचे ठरत आहेत.
या ठिकाणी या वाहनांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. परंतु पुन्हा हा प्रकार सुरू असल्यास कारवाई करण्यात येईल.
– अभय महाजन, साहाय्यक वाहतूक पोलीस अधिकारी, एपीएमसी, वाशी