नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई दौऱ्यामुळे नवी मुंबईसह मुंबई महानगरपट्ट्यातील प्रवासी शुक्रवारी कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद घेत आहेत. मोदी यांच्या दौऱ्यामुळे नवी मुंबई विमानतळ प्रकल्प तसेच आसपासच्या दगड खाणी बंद ठेवण्यात आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उरण तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोकळ्या हवेचा आनंद घेता येत आहे. उलवेकरांनाही मागील तीन दिवसांपासून प्रदूषण मुक्तीचा अनुभव घेता येत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीपासूनच उरणच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने नवी मुंबई, ठाणे-बेलापूर मार्ग, कल्याण शीळ रस्ता, शीळफाटा, तळोजा शीळ रस्ता तसेच मुंबई गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडीचा लवलेशही दिसत नव्हता. यामुळे संपूर्ण मार्गावर गोंडी मुक्त प्रवासाचा आनंद प्रवाशांना घेणे शक्य झाले.
पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उरण मधील जेएनपीए बंदर आणि बंदराच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे येथील दररोज मालाची ने-आण करणारी ३० हजाराहून अधिक वाहने बंद आहेत. परिणामी दररोजच्या रहदारीच्या रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. वाहतूक बंदीचे आदेश काढण्यात आल्याने जेएनपीए बंदरावर आधारित उद्योगातील मालाची ने आण करणारी कंटेनर वाहने बंद करण्यात आली आहेत. बंदरातील मालाची वाहतूक करून बंदरातून गोदमात आणि गोदमातून जहाजात माल नेणारी वाहनेही बंद आहेत.
हेही वाचा… उरण -खारकोपर मार्गावरील स्थानकांच्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त
हेही वाचा… पंतप्रधानांच्या स्वागताला नवी मुंबईत आगरी-कोळी परंपरेचा साज
शीव-पनवेल महामार्गावर, पनवेल आणि आसपासचा परिसरार, शिळ फाटा या भागात अवजड वाहतूकीमुळे नागरिकांना दररोज वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. पंतप्रधानाच्या सभेनिमित्ताने संपूर्ण अवजड वाहतूक आज बंद करण्यात आल्याने सकाळपासूनच प्रवाशांना कोंडी मुक्त प्रवासाचा अनुभव घेता आहेत.