उरण : शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत उरण विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आ. महेश बालदी यांनी पुन्हा एकदा उरणचे रण जिंकले आहे. मात्र उरण विधानसभा मतदारसंघात नव्याने पदार्पण करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रीतम म्हात्रे यांनी महेश बालदी यांना कडवी निकराची झुंज दिली आहे. त्यामुळे मतदारसंघात महाविकास आघाडीने आपल्या हातची येणारी जागा गमावली आहे. कारण शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढले असते तर भाजपा उमेदवाराला जिंकणे कठीण झाले असते. मात्र महाविकास आघाडीच्या मत विभाजनाचा लाभ भाजपा उमेदवाराला झाला आहे. या निवडणुकीत उरण मतदारसंघात एकूण २ लाख ६३ हजार ६४० मतदान झाले आहे. यातील ९५ हजार ३९० मते महेश बालदी यांना मिळाली असून त्यांचा विजय झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची ८८ हजार ८८७ मते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना मिळाली आहेत. या मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाची ही आता पर्यंतची सर्वात अधिक मते आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ. मनोहर भोईर यांना ६९ हजार ८९३ मते मिळाली आहेत. भोईर यांच्या २०१९ च्या मताममध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
उरण तालुक्यात उरण शहर आणि शेजारील चाणजे जिल्हा परिषद गटात मिळालेल्या मताधिक्यामुळे महेश बालदी यांना आघाडी मिळाली आहे. चाणजे जिल्हा परिषद गटात मनोहर भोईर – ५२८४,महेश बालदी – ८०७५, प्रितम म्हात्रे – ५७३७ मते मिळाली आहेत. २ हजार ३३८ तर उरण शहरात २ हजार ६३४ मतांची आघाडी मिळाली आहे. नवघर गट,मनोहर भोईर – ६४२६ महेश बालदी – ४५७२,प्रितम म्हात्रे – ६१६८,जासई गट- मनोहर भोईर – ४५७९,महेश बालदी – ६४१०,प्रितम म्हात्रे – ८५४२ या गटात म्हात्रे यांना २ हजार १३२ मतांची आघाडी आहे. चिरनेर गटात – मनोहर भोईर – ९१८५,महेश बालदी – ६९६९,प्रितम म्हात्रे – ९७९२ शहर वगळता उरण तालुक्यातील ग्रामीण भागात शेकापच्या प्रितम म्हात्रे यांना आघाडी मिळाली आहे.
हेही वाचा…वाशी, बेलापूरने भाजपला तारले चुरशीच्या लढतीत संदीप नाईक यांचा थोडक्यात पराभव
उरण मतदारसंघाच्या पनवेल तालुक्यात मोडणाऱ्या वाघीवली तरघर आणि ओवळे परिसरात प्रितम म्हात्रे यांना तर उलवे नोड,करंजाडे वसाहत परिसरात महेश बालदी यांना आघाडी मिळाली आहे. तर न्हावा,कोपर,बामण डोंगरी गव्हाण या प्रितम म्हात्रे यांच्या मुळ गावात त्यांना आघाडी मिळावी आहे. तर खालापूर तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गटात महेश बालदी यांनी आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत चार महिन्यापूर्वी पदार्पण करणाऱ्या प्रीतम म्हात्रे यांनी विद्यमान आ. महेश बालदी यांना काटेकी टक्कर दिल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे. यात मतदारसंघातील तरुणानी मोठ्या प्रमाणात म्हात्रे यांना भरघोष मतदान केले आहे. त्याचप्रमाणे गावोगावीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते ही सक्रिय झाले होते. याचाही फायदा त्यांना झाला आहे. उरण मतदारसंघातील माझा विजय हा विकासाचा विजय आहे. यापुढेही मतदारसंघात विकासाची कामे करणार आहे. – आ. महेश बालदी उरण, पनवेल आणि खालापूरच्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून भरघोस मतदान केले आहे. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सदैव तत्पर असू. प्रीतम म्हात्रे