उरण: गुरुवारी साजरा होणाऱ्या गोकुलकाला निमित्ताने उरण मध्ये शहरी व ग्रामीण भागातही लाखोंच्या हंड्या घोषीत झाल्या आहेत. यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षनेते आणि पक्षांच्याही हंड्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे उरण मधील गोविंदा पथकांना यावर्षी उरण मध्ये लाखोंची बक्षीसे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

उरण शहरात अनेक वर्षे दहीहंडी साठी हजारो रुपयांच्या हंड्या लावल्या जात होत्या. मात्र २०२० नंतर करोना मुळे यामध्ये घट झाली होती. येत्या वर्षात निवडणूक आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. उरण मध्ये भाजपा, शिवसेना(ठाकरे), राष्ट्रवादी या पक्षांनी दही हंडी जाहीर केली आहे. तर दरवर्षी प्रमाणे शिवप्रेमी संघटनेने जेएनपीटी कामगार वसाहती मध्ये १ लाखाची हंडी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आमदार महेश बालदी यांच्या मित्रमंडळाच्या वतीने उरण शहरात सहा थर लावणाऱ्या पथकाला सलामीला प्रत्येकी ११ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हेही वाचा… एसटी बंद असल्याने खासगी वाहतूकदारांकडून लूट

उरण मधील कोटनाका, बोरी,केगाव,सोनारी,पिरकोन आदी भागातील गोविंदा पथकांनी मागील महिनाभरापासून थरांचा सराव सुरू केला आहे. त्यातील अनेक गोविंदा पथक हे सात ते आठ थर लावीत मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल मधील दहीहंडीतील बक्षिसे पटकावीत आहेत.

Story img Loader