नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारात गेल्या काही दिवसांपासून हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, दर मात्र स्थिर आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर केल्याने बाजारात हापूसची आवक वाढत असून मंगळवारी बाजारात देवगडच्या ३९ हजार ८११ पेट्या, तर इतर ठिकाणच्या ८ हजार ६०१ पेट्या दाखल झाल्या. बुधवारी ५५ हजार ते ६० हजार पेट्या दाखल होण्याची शक्यता आहे. आवक वाढली असली तरी प्रतिपेटी दर मात्र १ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपये आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : पगार मागितला म्हणून मारहाण करीत व्यक्तीला तिसऱ्या माळ्यावरून ढकलले
हेही वाचा – पनवेल : अवकाळी पावसामुळे फूलदर चारपटीने वधारले
यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु दरम्यानच्या कालावधीत हवामान बदलाने उत्पादनावर परिणाम झाला आहे. उन्हाचा तडका बसत असून कोकणातील बागायतदार आता आंबा तोडणीवर भर देत आहेत. हवामानात उष्म्याने हापूसला कडक ऊन लागत असून त्याचा दर्जावर परिणाम होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक तोडणी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे हापूस तोडणी लवकर करण्यात आली आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत मार्चमध्ये तीन पटीने आवक वाढली आहे. गुढी पाडव्याला हापूसची मागणी वाढते. बाजारात गेल्या काही दिवसांपासून हापूसची आवक वाढत असून, मंगळवारी बाजारात कोकणातील ३९ हजार ८११ पेट्या, तर रायगड, कर्नाटक येथील ८ हजार ६०१ पेट्या दाखल झाल्या असून बुधवारी ५५ हजार ते ६० हजार पेट्या दाखल होतील, असे मत घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दर स्थिर असून ४ ते ६ डझनाची आंब्याची पेटी १ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपयांनी विकली जात आहे.