लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये स्पेनमधील रेयाल माद्रिद आणि बार्सिलोना या नामांकित फुटबॉल संघातील एल क्लासिको या फुटबॉल सामान्याचा अनुभव भारतीयांनी रविवारी घेतला. या सामन्यानंतर स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता. नवी मुंबई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दीड टन कचरा गोळा करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे व्होका स्पोर्टस प्रा.लि. च्या वतीने एफसी बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद लीजेंट्स या दोन फुटबॉल संघातील माजी खेळाडूंमध्ये रविवारी फुटबॉल सामना रंगला. या सामन्याला हजारो क्रीडाप्रेमींनी उपस्थिती लावली. त्या अनुषंगाने या कालावधीत नवी मुंबई पोलिसांनी सर्व जड अवजड वाहनांना दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत मनाई केली होती. तसेच अनेक भागातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल लागू करण्यात आले होते.
स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने पूर्वनियोजन आणि सामन्यानंतरचे नियोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी स्टेडियमजवळ उपस्थित राहून स्वच्छतेवर प्रामुख्याने भर दिला.
फुटबॉल सामन्यानंतर रात्री ११ वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ४० हून अधिक स्वच्छताकर्मी सहभागी होते. या परिसरात पडलेला दीड टन कचरा संकलित करण्यात आला. प्रकल्पस्थळी जमा करण्यात आलेला कचरा नेण्यात आला. यामध्ये प्लास्टिक बॉटल तसेच सुक्या कचऱ्याचे प्रमाण अधिक होते. काही महिन्यांपूर्वी ‘कोल्ड प्ले’ या आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन देखील येथे करण्यात आले होते. त्यावेळी देखील परिसरात झालेला कचरा महापालिकेच्या वतीने जमा करण्यात आला होता.
या उपक्रमात नेरूळ विभागाचे स्वच्छता अधिकारी अरुण पाटील आणि स्वच्छता निरीक्षक मिलिंद आंबेकर, नवनाथ ठोंबरे, भूषण सुतार यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व पर्यवेक्षक, स्वच्छता दूत आणि कचरा वाहतूक पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून डी वाय पाटील स्टेडियम बाहेरील रस्ते आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे तसेच नेरूळ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर हे देखील सहभागी होते.