‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या घोषात गुरुवारी घरोघरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारी दीड दिवसांच्या गणपतीला निरोपदेखील देण्यात आला. यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत सनई-चौघडे व ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढली. त्यामुळे आबालवृद्धांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसून आले.यावेळी गजाननाच्या स्वागताचा थाटमाट पाहता नवी मुंबईकरांची त्याच्या दैवतावर असलेली नितांत श्रद्धा दिसून आली.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना झाली. मोरया मोरया.. मंगलमूर्ती मोरया या जयघोषामुळे अवघे नवी मुंबईकर मंगलमय झाले होते. शुक्रवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईत सकाळी ८ वाजेपर्यंत ४.१५ मिमी. पावसाची नोंद झाली. दीड दिवसांच्या गणेशाला रिमझिम पावसात निरोप देण्यात आला.
पर्यावरणस्नेही मूर्तीकडे कल
यंदा पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे अनेकांचा कल राहिला. मात्र अशा मूर्ती फार उपलब्ध नसल्याने भाविकांनी पीओपीच्या लहान मूर्ती घेणे पसंत केले. नवी मुंबईत सुमारे पंधरा हजार मूतीर्र्ची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.