महासभेत आज १ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव, ३ वर्षांनंतर पालिकेला जाग
करावे गावाजवळ सेक्टर ३० येथे असलेल्या गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानाचा एक भाग खेळाच्या मैदानासाठी विकसित करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. या मैदानातील २२ हजार चौ. मी. जागा खेळासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर होऊन तब्बल तीन वर्षे उलटल्यानंतर मैदानाच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे करावे व परिसरातील खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे.
खेळाच्या मैदानासाठी १ कोटी एक लक्ष ५० हजार २४६ रुपये एवढा खर्च प्रस्तावित आहे. त्यात कुपण भिंत, मुख्य प्रवेशद्वार, क्रिकेट पीचसाठी आवश्यक गोष्टी पुरवण्यासह विविध कामे करण्याचे प्रस्तावित आहे.
प्रदर्शनी मैदान, खेळाचे मैदान आणि उद्यान असा संयुक्त वापर करण्यासाठी ११ मे २०१७ला तांडेल मैदानाचा ४६,७०२ चौरस मीटरचा भूखंड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. पालिकेने या मैदानाचे गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान असे नामकरणही केले. एकत्रित भूखंडाचा किती भाग कोणत्या वापरासाठी राखीव ठेवण्यात यावा हे निश्चित करण्यात आले नव्हते.
सिडकोने तिथे ‘हेलिपोर्ट’चा फलकही लावला. परंतु माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचा फलकही ग्रामस्थांनी उखडून टाकला होता. त्यानंतर सरकार दरबारी माजी पालकमंत्री व संबंधित विभागांच्या बैठका झाल्या होत्या. त्यामुळे अखेर हेलिपोर्टची जागा हलविण्याचे आदेश माजी पालकमंत्र्यांनी दिले होते. १९ ऑक्टोबर २०१० रोजी या भूखंडातील पंच्याहत्तर टक्के जागा खेळासाठी राखीव ठेवण्याची मागणी माजी नगरसेविका म्हात्रे यांनी मांडली होती. तर २०१५ ला मैदानाच्या विनियोगाबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला होता, मात्र कोणत्याही स्वरूपाचा विकास करण्यात आला नव्हता. तिथे राजकीय सभा, लग्नसोहळे, मेळावे असे विविध कार्यक्रम सर्रास होत. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसे.
करावे गाव हे नवी मुंबईतील सर्वात मोठे गाव आहे. गावातील तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. फोर्टी प्लसपासून विविध क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येते. परंतु तांडेल मैदानाचा वापर निश्चित नसल्याने अडचणी येत होत्या. सिडकोने याच भूखंडावर हेलिपोर्ट उभारण्याचा घाट घातला होता. परंतु ग्रामस्थांनी तो हाणून पाडला होता. वापराच्या निश्चितीनंतर पालिकेने मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मैदान विकसित केल्यानंतर खेळाडूंना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे.
– विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक
* भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ – ३६,७०२.७९ चौ.मी.
* प्र्दशनी मैदानाचे क्षेत्र – १०,०० चौ.मी.
* खेळाच्या मैदानाचे क्षेत्र – २२००० चौ.मी.
* उद्यानासाठी राखीव क्षेत्र – ४७०२.७९ चौ.मी.