उरण : ओएनजीसी प्रकल्पातून झालेल्या तेल गळतीमुळे शेतीचे आणि मच्छिमारांचे नुकसान झाले असून या संदर्भात ओएनजीसी आणि तहसील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांनी मंगळवारी ओएनजीसी प्रकल्प प्रवेशद्वार आणि उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी गुरुवारी बैठकीचे आश्वासन देण्यात आले आहे.
शुक्रवारी झालेल्या तेलगळती मुळे येथील मासेमारी व्यवसाय ही बाधीत झाला आहे. या बाधीत शेतकरी आणि मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यात स्थानिक व ओएनजीसी प्रशासन टाळाटाळ करीत आहे. यामुळे मोर्चा काढण्यात आला होता यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका पाटील,माजी सभापती सागर कडू, वैभव कडू, जनार्दन थळी, आप्पा कडू, सिताराम घरत, महेंद्र ठाकुर , किसन घरत आदीजण उपस्थित होते. तेलगळती नुकसान भरपाई साठी ओएनजीसी सोबत प्राथमिक चर्चा झाली असून गुरुवारी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.