नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली असून मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो २ ते ३ रुपयांची दरवाढ झाली आहे. बाजारात सध्या आवक कमी होत आहे, तसेच बहुतांश उत्तम दर्जाचे कांदे साठवणूक करून ठेवल्याने कांद्याच्या दरात वाढ होत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. एपीएमसीत प्रतिकिलो २२-२५ रुपयांनी विक्री होणारे कांदे आता २५ ते २९ रुपयांवर गेले आहेत.
पावसाळ्यामध्ये नित्यानेच कांद्याची दरवाढ होत असते. मात्र यंदा कांद्याचे उत्पादनही कमी आहे. त्यामध्येच वातावरणातील उष्णतेमुळे १० ते २० टक्के कांदा खराब होत आहे, तर दुसरीकडे उत्तम दर्जाचे कांदे साठवणूक करून ठेवले आहेत. बाजारात सध्या कांद्याची आवक कमी होत असून गुरुवारी बाजारात अवघ्या ६८ गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे कांद्याच्या दरात २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे शेतामधून कांदे काढण्यासाठी तसेच गाडीमध्ये शेतमाल भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे देखील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे.
हेही वाचा – पनवेल महापालिका माजी सैनिकांचा मालमत्ता कर कधी माफ करणार
गुरुवारी बाजारात ६८ गाड्या दाखल झाल्या असून कांदा २५ ते २९ रुपयांनी विक्री झाला आहे. पुढील कालावधीत देखील कांद्याची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्यामध्ये ठेवणीचे कांदे घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू असते. गेल्या वर्षी ठेवणीचे कांदे १२ ते १५ रुपयांपर्यंत उपलब्ध होते, मात्र तेच यंदा २० रुपयांवर विक्री झाली आहेत.
हेही वाचा – नवी मुंबई : पालिका विद्यार्थ्यांना यंदा वेळेवर गणवेश
यंदा कांद्याचे उत्पादन कमी आहे. त्याचबरोबर उत्तम दर्जाचा कांदा साठवणूक करून ठेवला आहे आणि उष्णतेमुळेही कांदे खराब निघत आहेत. त्यामुळे यंदा कांद्याची दरवाढ होत आहे – महेश राऊत, घाऊक व्यापारी, एपीएमसी