नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते ,परंतु सोमवारी पुन्हा कांद्याची दरवाढ झाली आहे. प्रतिकिलो दरात कमीत कमी २ ते ३ रुपये वाढ झाली आहे. एपीएमसीत कांद्याची आवक कमी असून ५०% ते ६०% हलक्या प्रतिचा कांदा दाखल होत आहे. तसेच पावसाने दडी मारल्याने नवीन कांदा लागवड केलेले उत्पादन देखील हाती लागणार नाही,त्यामुळे पुढील कलावधीत कांदा आणखीन वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. जानेवारी- फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. साठवणूकीचा कांद्याचा दर्जा ही घसरला आहे. त्यामुळे बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी उच्चतम प्रतिच्या कांद्याला उठाव असल्याने दर वाढ होत आहे. एपीएमसी बाजारात आधी प्रतिकिलो १५-१८ रुपयांनी उपलब्ध असलेले कांदे आता १८-२१रुपयांनी विक्री होत आहेत. सध्या पावसाने दडी मारली असून पावसाळी कांद्याच्या उत्पादनाला फटका बसत आहे,त्यामुळे पुढील कलावधीत ही नवीन कांद्याची उत्पादन कमी असून कांद्याचे दर आणखीन वधारण्याची शक्यता आहे अशी, माहिती व्यापारी महेश राऊत यांनी दिली आहे.