निर्यातबंदी आणि नवरात्रोत्सवात उठाव नसल्याचा परिणाम

नवी मुंबई : एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारात सध्या आवक निम्यावर असूनही ऑगस्टपासून वाढलेले कांद्याचे दर ऑक्टोबर महिन्यात कमी झाले आहेत. सरकारने केलेली निर्यातबंदी आणि नवरात्रौत्सवात कमी झालेली मागणी यामुळे दर कमी झाल्याचे मत घाऊक व्यापारी व्यक्त करत आहेत.

सरकारने कांद्याची दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी कांद्यावर निर्यातबंदी आणली. वाशी एपीएमसी बाजरातून १० ते २० टक्के कांदा निर्यात होत होता. निर्यात होणारा कांदा हा मोठय़ा आकाराचा असल्याने स्थानिक बाजारात या कांद्याला मागणी नसते. निर्यातबंदी केल्याने हा मोठा कांदा बाजारात पडून आहे. सध्या बाजारात कांद्याला उठाव कमी आहे, त्यामुळे दरात घसरण होत आहे.

नाशिक, ओतूर बाजारबंदचा एपीएमसीवर परिणाम नाही

नाशिक, ओतूर बाजारात कांद्याचे दर चढेच होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणारी दरघसरण ही शेतकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी बाजार बंद केला आहे. ३०-४० रुपये दरावर पोहचलेला कांदा दोन्ही बाजारांत २२-२६ रुपयांवर आला.

सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. सणात कांद्याला मागणी कमीच असते. तसेच निर्यातबंदी केल्याने तो कांदादेखील बाजारात पडून आहे. त्यामुळे आवक निम्मी असूनही उठाव नसल्याने दर कमी झाले आहेत. नवरात्रौत्सवानंतरच अधिक चित्र स्पष्ट होईल.

– मयूरेश वामन, घाऊक व्यापारी, एपीएमसी