नवी मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याच्या निषेधार्थ त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. शेतकरी, व्यापारी, आणि निर्यातदार यांनी बंद पुकारला आहे. आता त्याचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ही जाणवत असून, मंगळवारी बाजारात कांद्याची आवक निम्यावर झाली आहे. नागपंचमी आणि संपामुळे शेतकऱ्यांनी माल पाठविला नसल्याचे मत एपीएमसी व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आज कांद्याच्या घाऊक दरात दोन रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो २२-२५ रुपयांनी विक्री होत आहे.
बाजारात कांद्याचे दर वाढत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लागू केले आहे. निर्यात शुल्क लादल्याने त्याचा कांद्याच्या दरावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समिती मधील व्यापारी संघटना आक्रमक झाले असून आणि जागो जागी आंदोलने केली जात आहेत. सर्वाधिक कांदा विक्री होणाऱ्या नाशिक मधील लासलगाव बाजार समितीत सोमवार पासून कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे.त्याला पाठींबा देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारी बंद ठेवण्यात आली आहे.मात्र या बंदचा परिणाम दिसत असून मंगळवारी बाजारात कांद्याची आवक निम्यावर आली आहे. दररोज एपीएमसीत १००हुन अधिक गाड्या दाखल होतात झ मात्र मंगळवारी बाजारात अवघ्या ५१ गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात १८-२२रुपयांनी विक्री होणाऱ्या कांद्याच्या दरात २रुपयांनी वाढ झाली असून २२-२५रुपयांनी विक्री झाला आहे.