राज्यातील कांदा शेतकरी, व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वाशीतील एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी गुरुवार २४ ऑगस्टला बंद पुकारला होता. मात्र हा बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा बुधवारी सायंकाळनंतर करण्यात आली. त्यामुळे सदर बंद मागे घेतल्याची माहिती शेतकऱ्यांना उशिरा मिळाली,त्यामुळे गुरुवारी बाजारात कांद्याची आवक रोडावली आहेच शिवाय बाजारात ग्राहक की नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे कांद्याच्या दरावर कोणताही परिणाम झाला नसून दर स्थिर आहेत.
हेही वाचा >>> पनवेल पालिकेच्या तिजोरीत साडेचार महिन्यात 175 कोटी रुपये जमा
कांद्याच्या ४०% निर्यात शुल्क विरोधात नाशिक मधील व्यापाऱ्यांनी पुकरलेला होता. या बंदला वाशीतील एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी आज गुरुवारी एक दिवसीय बंद पुकारला होता. मात्र केंद्र सरकार कांदा खरेदी करणार असल्याने नाशिक येथील बाजार समितीने बंद मागे घेऊन गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीने देखील शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ म्हणून बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सायंकाळी उशीराने जाहीर करण्यात आला.मात्र यादरम्यान गुरुवारी मुंबई एपीएमसी बंदच राहणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. त्यामुळे बंद मागे घेण्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहचू शकली नाही आणि गुरुवारी बंद समजून शेतमाल भरला गेला नाही. परिणामी बाजारात कांद्याची आवक रोडावली असून अवघ्या ३० गाड्या दाखल झाल्या आहेत . बंद असल्याचे जाहीर केल्याने बाजारात ग्राहक ही फिरकला नाही त्यामुळे नित्यापेक्षा निम्याहून आवक कमी असून देखील दर प्रतिकिलो १९-२५ रुपयांवर स्थिर राहिले आहेत, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> “येत्या शंभर दिवसात एपीएमसी पुनर्विकास कृती आराखडा तयार करू”, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन
बटाटा दरात घसरण
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याबरोबर बटाटाही कमी प्रमाणात दाखल झाला आहे. गुरुवारी बटाट्याच्या अवघ्या २७ गाड्या दाखल झाले आहेत. बटाटा हा कांद्या पेक्षा लवकर खराब होतो. त्यामुळे बटाट्याची विक्री १ ते २ दिवसात होणे आवश्यक असते . बाजारात आवक कमी झाल्याने तसेच उठाव ही नसल्याने बटाट्याच्या दरात मात्र दोन रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक मध्ये प्रतिकिलो बटाटा १३ते १५रुपयांवर १२-१४रुपयांनी विक्री होत आहे.