उरण: कांदा निर्यातीवर शुल्क वाढीचा निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात दुबई, श्रीलंका आणि मलेशिया या देशात निर्यातीसाठी आलेला २०० कंटेनर मधील ४ हजार टन कांदा सडू लागला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क वाढ केली आहे. त्यामुळे जेएनपीए बंदरात आलेले कंटेनर सीमा शुल्क विभागाने थांबविले आहेत. कांदा हा नाशिवंत असल्याने यामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.
केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क शुन्यावरुन थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेकडो कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत. त्याचप्रमाणे जेएनपीए बंदरातील अनेक गोदामात ही आशा प्रकारचे निर्यातीसाठी आलेले कांद्यानी भरलेले कंटेनर उभे आहेत.
हेही वाचा… नवी मुंबई परिवहन विभागाचे नियोजन कसे? चालते ? वाशीत ‘लोकसत्ता शहरभान’चे आयोजन
या कंटेनर मधील कांदा सडून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी, निर्यातदार व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.तसेच केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मात्र शेकडो निर्यातदार आर्थिक संकटात सापडले असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.