नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांपैकी फक्त ५० शिक्षकांना कायम करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी घेतला आहे. त्याच धर्तीवर आता १२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठवण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत १२ वर्षे ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांनाही आता कायम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेतील ठोक मानधनावरील फक्त ५० शिक्षकांनाच कायम केले असून त्यांच्यापेक्षा अधिक कालावधी पालिकेत काम करणाऱ्या शिक्षकांना मात्र डावलण्यात आले होते. याबाबत आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्तांना धारेवर धरत जास्त सेवा केल्यानंतरी शिक्षकांना कायम न करता फक्त ५० शिक्षकांना कायम केल्याबद्दल जाब विचारत जोपर्यंत इतर शिक्षकांना कायम करत नाही तोपर्यंत ५० शिक्षकांना कार्यादेश न देण्याचा इशारा नाईक यांनी दिला होता. त्यामुळे आतापर्यंत ५० शिक्षकांना पालिकेने कार्यादेश दिले नाहीत. तर नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेतील १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या शिक्षकांचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागातील फक्त ५० शिक्षकांना कायम करण्याच्या निर्णयानंतर उर्वरित शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

हेही वाचा – मुंबई : माझगाव यार्डजवळ रुळावरून इंजिन घसरले, अप जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

आता नगरविकास विभागाने १२ वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितला आहे. त्यामुळे जोपर्यंत अनेक वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांनाही कायम करत नाही तोपर्यंत ५० शिक्षकांना कार्यादेश दिला जाऊ देणार नाही. – संजीव नाईक, माजी खासदार

हेही वाचा – वैयक्तिक करारनामा दिल्यानंतरच झोपडी जमीनदोस्त करता येणार! झोपु प्राधिकरणाचा आणखी एक निर्णय

नवी मुंबई महापालिकेला नगरविकास विभागाकडून १२ वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना कायम करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास विभागाकडे तत्काळ पाठवण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. – राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका