पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आय.टी.आय.) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. मंगळवार (ता.२०) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रायगड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित कऱण्यात आला आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा फायदा घेण्याचे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा- इमारतींच्या पुनर्विकास प्रशिक्षणास उरणकरांचा प्रतिसाद; अॅड. श्रीप्रसाद परब यांचे मार्गदर्शन
४६७ पेक्षा जास्त रिक्त पदांची होणार भरती
या रोजगार मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील आस्थापन विभागातील ४६७ पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. या मेळाव्यात एस.एस.सी. (दहावी) उर्त्तीण, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मासिस्ट इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती http://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२२१४१-२२२०२९ वर संपर्क साधावा. तसेच या विनामूल्य रोजगार मेळाव्यास इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आलं आहे.