सध्या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला जनमानसात विश्वास निर्माण करण्याची गरज लक्षात घेता, या क्षेत्रातील महिला संचालिकांनी हे आव्हान स्वीकारून कार्यरत राहणे आवश्यक आहे. तसेच हा सहभाग ज्ञानाधिष्ठित असेल तर त्यांच्याकडे आपोआपच नेतृत्त्वाची धुरा येऊन प्रतिमा संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास चालना मिळेल असे प्रतिपादन जेष्ठ बैंकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी केले आहे. वाशी येथे दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. मुंबई यांनी दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला संचालिकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत उपस्थित महिला संचालिकांना उद्देशून ते बोलत होते.

हेही वाचा- सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी; पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

महिलांनी खुल्या प्रवर्गातूनही निवडून येणेही आवश्यक

सहकार कायद्यामध्ये दोन महिला संचालिकांची असलेली राखीव तरतूद व त्यामुळे महिलांना नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळात मिळालेले स्थान, इतक्या मर्यादित स्वरुपात हा सहभाग न ठेवता, महिलांनी खुल्या प्रवर्गातुनही निवडून येणेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच संचालक मंडळातील कामकाजात प्रभावी योगदान देण्यासाठी बँकिंग विषयक कायदा, नियम, व्यवहार, उपविधी यांचे ज्ञान व त्यांची आवश्यकता याविषयी सखोल माहिती मिळविल्यास महिलांचा सहभाग हा ‘ज्ञानाधिष्ठित’ होईल, असे अनास्कर म्हणाले. यामुळे पुढील काळात महिला संचालिकांचे पद हे नुसते शोभेचे पद न ठरता कायदेशीर जबाबदारीचे पद ठरावे, अशी अपेक्षा या कार्यशाळेत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- इमारतींच्या पुनर्विकास प्रशिक्षणास उरणकरांचा प्रतिसाद; अ‍ॅड. श्रीप्रसाद परब यांचे मार्गदर्शन

१०० हुन अधिक महिला संचालिकांचा कार्यशाळेत सहभाग

पहिल्या तीन तासाच्या सत्रात विद्याधर अनास्कर यांनी सहकारी मूल तत्त्वे, सहकारी बँकिंगचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व, परिणामकारक निर्णय प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी इत्यादी माहितीचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे संदर्भ देत सादरीकरण केले. दुसऱ्या सत्रात रिझर्व्ह बँकेच्या उप महाव्यवस्थापक भाग्यलथा कौशिक यांनी सहकारी बँकांची रचना, त्यांची वैशिष्ट्ये, टॅफकची भूमिका, बँकिंग नियमन कायद्यात नुकत्याच झालेल्या सुधारणा, संचालकांची भूमिका व कार्ये, संचालक मंडळाकडून रिझर्व्ह बँकेस असलेल्या अपेक्षा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. च्या मुख्य कार्यकारी व सचिव सायली भोईर फेडरेशनच्या संचालिका शशी अहिरे, शोभा सावंत तसेच उद्यम बँकेच्या संचालिका लिनाताई अनास्कर व उपस्थित होते. तसेच राज्यातील सुमारे १०० हुन अधिक महिला संचालिकांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदविला.

Story img Loader