नवी मुंबई -पावसाळ्याच्या दिवसात अनेक साथीचे आजार पसरत असून नवी मुंबई शहरात जीबीएस सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या आजरामुळे मानवी शरीरावर घातक परिणाम होत असून शरीर संवेदनाहीन होऊन श्वास घेणे अडचणीचे होत असल्यामुळे या रुग्णाला कृत्रिम श्वासावर ठेवावे लागत आहे. नवी मुंबई शहरातील सानपाडा गावात अशा प्रकारचे चार रुग्ण आढळले असल्याची माहिती माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच या प्रकारच्या आजाराबाबत महापालिकेने गांभीर्याने विचार करून तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या आजाराची लक्षणे कशामुळे होत आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या नेरूळ ,ऐरोली, वाशी या तीनही रुग्णालयात अशा प्रकारची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांबाबत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आलेले आहेत.
हेही वाचा >>>मुंबईत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेनची स्थिती काय? पावसाचा जोर वाढला, रेल्वेने दिली माहिती
नवी मुंबई महापालिकेने जीबीएस आजाराच्या उपचाराबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करावा..
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जीबीएस आजाराचे रुग्ण आढळत असून सानपाडा गावात चार रुग्ण आढळले आहेत याबाबत नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला संपर्क केला असून हा आजार खर्चिक असल्याने व रुग्णाला व्हेंटिलेटर ची आवश्यकता लागत असल्याने पालिकेने महापालिका रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करावा अशी मागणी केली आहे.– सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक
नवी मुंबई शहरात जीबीएस सिंड्रोमची लक्षणे आढळल्यास रुग्णाला तात्काळ दाखल करून योग्य ते उपचार करावेत. कारण या आजारामुळे रुग्णाला श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे प्राथमिक स्वरूपातच तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे.-डॉक्टर प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी नवी मुंबई महापालिका