Overhead Wire: मानखुर्द ते वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर ( Overhead Wire ) तुटल्याने गर्दीच्या वेळी कामावर निघणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तसंच ही सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरची लोकल सेवा या घटनेमुळे विस्कळीत झाली आहे. यानंतर हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि चाकरमान्यांना ट्रान्सहार्बर मार्गावरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचा खोळंबा
हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर ( Overhead Wire ) तुटली. सकाळी साधारण ८ वाजचण्याच्या दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे येणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. गेल्या १५ ते २० मिनिटांपासून हार्बर मार्गावरील अनेक लोकल या विविध स्थानकात थांबल्या आहेत. तर काही लोकल या ट्रॅकवरही थांबल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांदरम्यान बिघाड
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर ( Overhead Wire ) तुटल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. सध्या ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करुन वाहतूक पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरु आहे.
प्रवाशांना ट्रान्सहार्बरने प्रवासाची मुभा
सकाळी ८ पासून पुढच्या कालावधीत प्रवाशांना काढलेल्या त्याच तिकीट आणि पासचा वापर करत ट्रान्सहार्बर मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना ट्रान्सहार्बरद्वारे प्रवास करता येईल. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असंही मध्य रेल्वेने म्हटलं आहे.
लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा
मुंबईतल्या सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरुन रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने, पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. पनवेलहून सीएसएमटी पोहचण्यासाठी दीड तासाचा अवधी लागतो तर वाशीहून साधारण १ तासात पोहचता येतं. अनेक विद्यार्थी आपल्या शाळा-कॉलेजला जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.