ठाणे-ऐरोली स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-ऐरोली रेल्वे स्थानकांदरम्यान ठाणे खाडीपुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६.४२ च्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळीच हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशी, नोकरदारांचे आणि गावी जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. कार्यालय गाठण्याच्या वेळेतच ही घटना घडल्याने हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवरच अडकून पडले होते. सकाळी ८.२५ मिनिटांच्या सुमारास तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये एकून २३ गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर त्यानंतरदेखील रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी १ तासापेक्षा अधिक काळ लागला.
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमुळे व सरकारी कार्यालय या परिसरात असल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावर प्रचंड प्रमाणात गर्दी असते. सकाळी ६.४२ वाजण्याच्या सुमारास ठाणे-ऐरोली रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा कोलमडली. या वेळी ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली, रबाले, घणसोली, कोपरखरणे, तुभ्रे रेल्वे स्थानके चाकरमान्याच्या गर्दीने तुडुंब भरली होती. ट्रान्स हार्बरवरील रेल्वे व्यवस्था ठप्प झाल्याने रिक्षाचालकांकडून प्रवाशांची जादा भाडे आकारून लुबाडणूक करण्यात येत होती, तर एनएनएमटी, बेस्ट, एसटी या गाडय़ा प्रवाशांनी ठाणेवरून वाशीकडे जातानाच भरून येत असल्यामुळे प्रवाशांना बसमध्येदेखील चढणे गैरसोयीचे झाले होते. सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे सुरू झाल्यानंतर बस स्टॉप व रिक्षासाठी असणारे चाकरमानी यांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकांकडे वळवला; पण रेल्वेमध्ये तुडुंब भरलेली गर्दी पाहून चाकरमान्यांची निराशा झाली; पण तशाच गर्दीत चढून चाकरमान्यांनी प्रवास केला, तर नवी मुंबई परिवहन सेवेने रेल्वे ठप्प झाल्यामुळे जादा सोडल्या असून फेऱ्यामध्ये वाढ केली होती; पण वाहतूक कोंडीमुळे बसेस जादा सोडूनदेखील प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वेची तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतरदेखील रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तासापेक्षा अधिक काळ गेला. या वेळी २३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. रेल्वे व्यवस्था ठप्प झाल्यामुळे नागरिकांनी बसने व रिक्षाने प्रवास करणे पसंत केले; पण ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथील नोसिल नाक्याजवळ पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा