पनवेलच्या प्रगतीचा कालक्रम ‘पनवेलायन’मधून उलगडणार

पनवेल : एकेकाळी पाश्चात्त्य राष्ट्रांतून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी मोक्याचे बंदर असलेल्या पनवेलच्या कुशीत आता आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहात आहे.  १८५२ साली स्थापन झालेली राज्यातील पहिली नगरपालिका ते महानगरपालिका हा प्रवासही रंजक आहे. या प्रवासाचा उलगडा ‘लोकसत्ता’कृत ‘पनवेलायन’ या कॉफीटेबल पुस्तकातून होणार आहे.

पनवेलबाबतच्या अनेक आठवणी, किस्से, आख्यायिका यांचा समावेश असलेल्या ‘पनवेलायन’ या कॉफी टेबल बुकचे पुढील आठवडय़ात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. जुन्या एसटी स्टॅण्डवरील गजबज, त्यावेळचे वाडे, व्यक्ती यांचा वेध घेणारे वैशिष्टय़पूर्ण लेख या कॉफीटेबलमध्ये आहेत. पनवेल शहराची सद्यस्थिती आणि भविष्यातील नियोजन यांवर सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या पुस्तकात आपली मते मांडली आहेत. त्याबरोबरच या शहराला वर्तमानात भेडसावणारे प्रश्न आणि भविष्यातील आव्हाने यांचा आढावाही या कॉफी टेबल बुकमध्ये असणार आहे. क्रीडा, संस्कृती, संगीत, निसर्गसंपदा, पर्यटन अशा अनुषंगानेही पनवेलचे महत्त्व सांगणाऱ्या लेखांचा, छायाचित्रांचा या कॉफीटेबल बुकमध्ये समावेश असणार आहे.

पनवेलमध्ये पुढील आठवडय़ात होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी पनवेलच्या एकंदरीत विकासावर चर्चा घडवून आणणारा परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असणार आहे.

प्रायोजक

‘लोकसत्ता’कृत ‘पनवेलायन’ या कॉफीटेबल बुकचे सहप्रायोजक अधिराज कन्स्ट्रक्शन हे असून ‘पॉवर्डबाय’ सहकार्य एस. आर. रिसॉर्ट, पनवेल, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, जमीन प्रा. लि. यांचे लाभले आहे.

Story img Loader