लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने पामबीच मार्गालगत उभारलेल्या सायकल ट्रॅकच्या बांधकामप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी दोघा अभियंत्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असताना या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या सायकल ट्रॅकची बांधणी सदोष असल्याच्या तक्रारी सुरुवातीपासून केल्या जात आहेत. बांधकाम पूर्ण नसताना ठेकेदाराला दिली गेलेली बिले, सदोष बांधणी तसेच या प्रकल्पाची निविदा रक्कम फुगविण्यात आली होती का असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात असून या प्रकरणी चौकशीचे टोक काही माजी वरिष्ठ अभियंत्यांच्या दिशेनेही जाण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेने शासनाकडे सादर केलेल्या विकास आराखड्यात शहरातील सायकल ट्रॅकचे आरक्षण रद्द केले आहे. काही महिन्यांपूर्वीच महापालिका मुख्यालयालगत एका सायकलपटूचे सायकल चालवताना अपघाती निधन झाले होते. महापालिकेने पामबीच मार्गावर उभारलेला सायकल ट्रॅक सलग नसून येथील सिग्नलजवळ हिरवे पट्टे मारून सायकल ट्रॅक रस्त्यावर वळविण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण ट्रॅकची निर्मिती चुकल्याचा आरोप अगदी सुरुवातीपासून केला जात आहे. पालिकेला सायकल ट्रॅकची निर्मिती करताना पर्यावरणपूरक गोष्टींचा विचार करण्याची सूचना महाराष्ट्र किनारा नियमन प्राधिकरणाने केली होती. यामध्ये डांबरीकरणाचा वापर कमी करून बायोबायंडर तसेच इतर पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर केला जावा असा आग्रह धरण्यात आला होता. प्रत्यक्षात सायकल ट्रॅकच्या या साहित्याचा किती वापर केला गेला याविषयी आता पर्यावरणप्रेमी तसेच तज्ज्ञांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.

आणखी वाचा-‘पामबीच’चा सायकल ट्रॅक वादाच्या फेऱ्यात; ठेकेदारही अडचणीत, चौकशी प्रक्रिया सुरू

सदोष बांधणीची कथा

महापालिका मुख्यालयाच्या जवळून सुरू होणारा हा मार्ग सुरुवातीला वाशी, सानपाड्याच्या मोराज चौकापर्यंत आखण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यात बदल करण्यात आले. या सायकल ट्रॅकचे कामही दर्जाहिन असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. सायकल ट्रॅकची निर्मिती करताना विविध ठिकाणी सिग्नल तसेच खाडी किनाऱ्याचा अडथळा उभा राहिला आहे. दुसरीकडे करावे वजरानी चौकापासून अक्षर चौकापर्यंतच्या दरम्यानच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. तसेच पामबीच ज्वेल ऑफ नवी मुंबईनजीक असलेल्या कामाबाबत वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले होते. या अडथळ्यांमुळे हा ट्रॅक केवळ नावाला उरला असून याचा वापर पादचारी चालण्यासाठी अधिक करताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे.

नव्याने चौकशीची आवश्यकता

या प्रकल्पाचे काम मेसर्स साकेत इन्फोप्रोजेक्ट यांच्यामार्फत करण्यात आले. या कामाचे बिल आधीच अदा केल्याबद्दल महापालिका आयुक्त डाॅ. कैलाश शिंदे यांनी दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे. मुंबई सायकलिंग एन्थ्युजियाज संस्थेचे चेतन शहा यांनीसुद्धा नवी मुंबईतील सायकल ट्रॅक व सायकल ट्रॅकच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अभियंत्यांवर कारवाई करताना महापालिकेने या प्रकल्पाशी संबंधित ठेकेदार तसेच रचनाकारावर कोणती कारवाई केली याविषयी मात्र महापालिका वर्तुळात कमालीची गुप्तता पाळली जात आहे. विशेष म्हणजे या कामाचे बिल लवकर अदा केले जावे यासंबंधी महापालिकेच्या अभियंता विभागातील ठरावीक अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता याविषयी खमंग चर्चा आता सुरू झाल्या आहेत. एका माजी वरिष्ठ अभियंत्याने या कामाकडे केलेले दुर्लक्ष हादेखील चर्चेचा विषय ठरला आहे.

आणखी वाचा-मोरा-मुंबई, रेवस-करंजा रो रो सेवेला पुन्हा खो

नवी मुंबईतील सायकल ट्रॅकचे काम चुकीचे असून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. शहराला पाणीपुरवठा कणाऱ्या मोरबे धरणातून येणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर सायकल ट्रॅकची निर्मिती केली आहे. ज्या शहर अभियंत्याच्या कार्यकाळात सायकल ट्रॅक झाला त्यासंबंधित अधिकाऱ्यांवरही पालिकेने कारवाई करायला हवी. -समीर बागवान, पदाधिकारी, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष

महापालिका अधिकाऱ्यांनी तसेच ठेकेदाराने नियमाच्या चौकटीत राहून काम करायला हवे. त्यामुळे जबाबदार असलेल्या ठेकेदारावरही कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी कोणतेही चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही. -डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका