अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

पामबीच मार्गाची मायक्रोसरफेसिंग या जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुरुस्ती केल्यानंतर मार्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे आणि प्रवासही अधिक सुकर झाला आहे. वाटेतले अडथळे दूर झाल्यामुळे ताशी ६० किमीच्या वेगमर्यादेचे वाहनचालक उल्लंघन करू लागले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जरा जपून वाहने चालवावीत, असे आवाहन वाहतूक विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

डांबरीकरणाऐवजी मायक्रोसरफेसिंग केल्यामुळे खर्च कमी झाला असून रस्ता पाच वर्षे सुस्थितीत राहण्याची हमी ठेकेदाराने दिली आहे. खड्डय़ांचा अडथळा दूर झाल्यामुळे देखण्या व गुळगुळीत झालेल्या या मार्गावर वाहनांचा वेग वाढवला जात आहे. अतिवेगामुळे अपघात होण्याची भीती आहे. ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या मार्गावर वाहनांच्या वेगावर र्निबध ठेवण्यासाठी ६ सिग्नलही आहेत.

या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत पालिकेने सर्वेक्षणही करून घेतले होते. अपघात होऊ  नयेत यासाठी पालिकेने काळजीही घेतली होती. परंतु आता नव्याने झालेल्या कामामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील वाहनांचा वेग वाढू लागला आहे.

या मार्गावर सकाळी फेरफटका, व्यायामासाठी, सायकलिंगसाठी येणारे यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अपघात झाल्यास जिवावर बेतू शकते.

कोणत्याही मार्गावर होणारे १ टक्का अपघात वाहनांतील यांत्रिक बिघाडामुळे होतात. उर्वरित सर्वच अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे व वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे होतात. पामबीच मार्गावर वेगाची मर्यादा ताशी ६० किमी आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत.

नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग

पामबीच मार्गावर मायक्रो सरफेसिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वाहन चालवण्यासाठी हा रस्ता चांगला  झाला असला तरी अतिवेगाने सुसाट वाहने चालवणे धोक्याचे आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत. वेगाची मर्यादा पाळल्यास अपघात टाळता येतात. त्यामुळे या मार्गावरही वेगाची मर्यादा सांभाळून गाडी चालवावी.

मोहन डगावकर, शहर अभियंता