स्थलांतरित पक्षी परतले; जैवविविधता उद्यान उभारण्याची मागणी
नवी मुंबई : पाणजे पाणथळ क्षेत्रात भरतीच्या पाण्याला अटकाव करीत बुजवलेले पाच मार्ग खुले करण्यात आले असून आता या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमनही होऊ लागले आहे. सिडको, महसूल आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांसह नॅट कनेक्ट फाउंडेशन आणि श्रीएकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रतिनिधी तसेच मच्छीमारांनी मंगळवारी तीन तास सुमारे ३०० हेक्टरच्या परिसरात पाहणी करून हे पाचही प्रवाह खुले केले.
हा पाणथळ परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याची याचिका वनशक्ती फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली आहे. ओहोटीची वेळ असल्याने प्रवाहाचे पाणी समुद्रात परतून जात असल्याचे निदर्शनास आले. ११ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य पर्यावरण विभागाकडून प्रवाहाचे मार्ग खुले करण्याविषयी आदेश देण्यात आले होते. मात्र त्या दिशेने कोणतीही हालचाल दिसून आली नाही. श्रीएकवीरा आई प्रतिष्ठानच्या याचिकेला प्रतिसाद देताना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पश्चिम क्षेत्र खंडपीठाने रायगड जिल्हाधिकारी व सिडकोकडे राज्य सरकारच्या आदेशांची खातरजमा करण्यास सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तक्रारींची दखल घेतमार्ग खुले करण्यात पुढाकार घेतला. नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी शासनाकडे पाणथळ क्षेत्राला जैवविविधता उद्यानाचा दर्जा देण्यासंबंधी पुढकार घेण्याबाबत विनंती केली आहे. तसेच या क्षेत्राचे संवर्धन करून ‘सेझ’बरोबर करण्यात आलेला भाडे व्यवहार रद्द करण्याचीही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत पर्यावरण विभागाला सूचना केल्याची माहिती बी. एन.कुमार यांनी दिली. हे पाणथळ क्षेत्र अनेक प्रकारच्या माशांचे प्रजोत्पादक केंद्र असून या ठिकाणी भरतीच्या पाण्याचा मार्ग खुला झाल्याने मच्छीमारांत समृद्धी नांदेल.
नंदकुमार पवार, प्रमुख, श्रीएकवीरा प्रतिष्ठान