पनवेलः तेरा वर्षानंतरही रोहिंजन गावामध्ये हेक्ससीटी या खासगी महागृह प्रकल्पामधील १६० गुंतवणूकदारांना हक्काचे घर न मिळाल्याने सुप्रिम कन्स्ट्रक्शन डेव्हलेपमेंट प्रा. लिमीटेड या विकासक कंपनी आणि त्यांच्या भागीदारांविरोधात तळोजा पोलिसांनी ४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. तळोजा पोलिसांनी मुदतीमध्ये सदनिका न दिल्याने गुंतवणूकदारांचे हक्क ध्यानात घेता भारतीय दंडसंहिता १८६० च्या कलम ४०६, ४२० नुसार महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका बांधण्यास प्रोत्साहन देणे, विक्री, व्यवस्थापन, हस्तांतरण या नियमांतर्गत ४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल ही कारवाई करण्यात केली आहे.
गणेश बिस्ट व इतर गुंतवणूकदारांनी त्यांची फसवणूक सुप्रीम विकासक कंपनीने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागील १३ वर्षात रोहिंजन गावातील नरेंद्रकुमार भल्ला यांच्या १५ एकर जमिनीवर हेक्ससीटी बांधणार असल्याचे सांगून या महागृहनिर्माण प्रकल्पात १८०० सदनिका उभारणार असे गुंतवणूकदारांना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात अजूनही १६० गुंतवणूकदारांना त्यांचे हक्काचे घर न मिळाल्याने गुंतवणूदकारांनी पोलीस ठाण्यात कायदेशीर कार्यवाही करण्याचा मार्ग निवडला.
हेही वाचा…भूमिपुत्रांना रोजगार मिळणे हीच खरी आदरांजली; १९८४ च्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
२०१० साली ३० ते ४० लाख रुपयांमध्ये सदनिका बांधून देऊ असे गुंतवणूकदारांना सुप्रिम विकासक कंपनीने आश्वासित केले होते. गुंतवणूकदारांनी त्यासाठी बॅंकेतून कर्ज काढून आणि स्वतःजवळील जमविलेली रक्कम विकासक दिल्यानंतर सुद्धा सदनिका बांधून दिली नाही. मुद्रांक नोंदणी दस्त गुंतवणूकदारांसोबत केल्यानंतर या गृहप्रकल्पाचे नाव क्लॅनसीटी असे बदलण्यात आले.
तसेच जमीन मालक भल्ला यांचे सुद्धा पैसे थकविल्याने भल्ला यांनी विकासकाविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने जमीन मालक भल्ला यांच्यासोबत केलेल्या कराराची पुर्तता विकसक कंपनीने न केल्याने त्यांची बँक खाती गोठविली.
हेही वाचा…घणसोली-ऐरोली प्रकल्प दृष्टिपथात; पामबीच मार्ग विस्तारीकरण प्रकल्पाची निविदा जाहीर
विकासक कंपनीकडे जमिनीचा ताबा नसताना सुद्धा त्यांनी गुंतवणूकदारांकडून सदनिका बांधण्यासाठी आणि इतर कामांसाठी रक्कम घेतल्याने तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश काळदाते यांनी या प्रकरणी सुप्रिम विकासक कंपनीचे मानुला मेहबुल्ला काचवाला, ललित शाम टेकचंदानी, काजोल ललित टेकचंदानी, अरुण हसानंद मखीजानी तसेच सुप्रिम विकसक कंपनीचे माजी आणि विद्यमान संचालकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.