पनवेल : फलकाव्दारे जनजागृती करून, तोंडी आवाहन करून सुधारणा होत नसल्याने पनवेल आगार व्यवस्थापकांनी नियम न पाळणाऱ्यांसाठी सुरक्षारक्षकांच्या दंडुक्याचा आधार घेण्याची वेळ आली आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस आगारांमधील सर्वेक्षणात पनवेल बस आगाराला ४१ गुण मिळाले. ९ एकर जागेवर पनवेल बस आगार विस्तारले आहे. ३३०० बस दिवसाला आगारामध्ये ये-जा करतात. प्रवासी व त्यांना सोडणारे इतर असे ४० हजार नागरिक या आगारात ये-जा करतात. दोन कोटी रुपयांचे महिन्याचे तिकीटातून उत्पन्न होणाऱ्या आगारात सर्वात मोठी समस्या नागरिकांची स्वयंशिस्तीची आहे.
हेही वाचा – पनवेल : तिरुपती बालाजी मंदिराची बांधणी पाणथळ जागेवर
आगार व्यवस्थापक पदाचा पदभार सूजीत डोळस यांनी घेतल्यानंतर मे महिन्यापासून आगारामधील अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले. आगारामध्ये २७८ कर्मचारी काम करतात. हे कर्मचारीसुद्धा स्वच्छतेसाठी पुढाकार घेत आहेत. स्वत:पासून स्वच्छतेची सुरुवात करुया असे धडे आगारातून देण्यासाठी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना वेळोवेळी आवाहन करूनही सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता मोकळ्या जागेवर पुरुषांकडून उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रकार वाढले आहेत.
हेही वाचा – जेएनपीए बंदर परिसरात वाहनातील डिझेल चोरांचा सुळसुळाट, चालकांनी डिझेल चोरांना पकडले
सार्वजनिक शौचालयाची सोय करूनही प्रवासी उघड्यावर जात असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षक कायमस्वरुपी नेमण्याची वेळ पनवेल बसआगार प्रमुखांवर आली आहे. अखेर व्यवस्थापक डोळस यांनी रक्षकांना आवाहन करूनही न ऐकणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्याची सूचना केली आहे.