पनवेल : अपु-या पाणी पुरवठ्यामुळे पनवेलकरांना तब्बल सहा महिने आठवड्यातील एक दिवस पाण्याविना कोरडा पाळावा लागतो. मागील दोन वर्षांपासून हीच पद्धत रुजली आहे. मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध कामांना गती मिळाली. त्यामुळे पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर पनवेलकरांना आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा लागणार नसल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
हक्काचे अप्पासाहेब वेदक जलाशय (देहरंग धरण) असले तरी पनवेल शहर हे पाण्याबाबत अद्याप तरी संपन्न नाही. उलट दिवसांदिवस पनवेलची लोकसंख्या आणि पाण्याची मागणी वाढत चालली आहे. पनवेल शहराला ३२ दश लक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. आठवड्याचा एक दिवस कोरडा पाळल्याने दिवसाला २५ दश लक्ष लीटर पाण्याची गरज आहे. पनवेल पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सध्या २० दश लक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३ दश लक्ष लीटर आणि देहरंग धरणातून ३ दश लक्ष लीटर पाण्याची उसनवारी करुन पनवेल शहरातील रहिवाशांची तहान भागविली जाते.
हेही वाचा…पनवेलमधील भारतनगर झोपडपट्टीत राहणा-या बांगलादेशीय नागरिकांना ताब्यात घेतले
यापूर्वी एमजेपीकडून पनवेल शहराला कमी पाणी पुरवठा केला जात होता. याबाबत भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये पाणी वाढ तातडीने करण्याचा निर्णय झाला. तसेच एमजेपीचे कार्यकारी अभियंता के.बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार २०० अश्वशक्तीचे दोन मोटारपंप पाणी पुरवठ्यासाठी बसविण्यात आले असून त्यापैकी एक कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच एमजेपीने नवीन पनवेल येथील एमटीएनएलच्या इमारतीपासून शबरी हॉटेलच्या मागील रेल्वे कर्मचारी निवासापर्यंत १.४ किलोमीटर लांबीची जीर्ण जलवाहिनी काढून त्याठिकाणी नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली आहे. त्यामुळे लवकर पनवेल शहरासह नवीन पनवेल वसाहतीला पाण्याबाबत दिलासा मिळणार आहे. नवीन जल योजनेअंतर्गत ८८५ अश्वशक्ती चे मोटार पंपाच्या व्दारे पाणी पुरवठा होणार असून हे मोटारपंप मार्च महिन्याअखेरपर्यंत सूरु होतील. त्याचा लाभ कळंबोली व इतर वसाहतींना सुद्धा होईल असेही पाटील यांनी सांगितले.