पनवेल : नवीन पनवेल येतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीझन क्रिकेट मैदान आणि महापालिकेने विकसित केलेल्या लोकाभिमुख ॲप सेवेसह अनेक विकासकामांचे लोकार्पण सोहळा पुढील आठवड्यात पनवेलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. पनवेल पालिकेत याची लगबग सुरू असून विकासकामांचा सद्यस्थितीतील आढावा घेण्याचे काम पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडून सुरू आहे.

नवीन पनवेल उपनगरात सेक्टर ११ येथील ३० हजार चौरस मीटर क्षेत्रावर ९ कोटी रुपये खर्च पनवेल महापालिकेने सीझन क्रिकेट अकादमी उभारली आहे. या अकादमीच्या मैदानावर दहा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पीच तयार केले आहेत. सीझनचा चेंडू ठरावीक उंचीपर्यंत या पीचवर उडेल अशी आखणी पालिकेने केली आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात हे मैदान दिलीप वेंगसरकर यांच्या अकादमीला हस्तांतरित केले जाईल. पुढील १९ वर्षांसाठी वेंगसरकर यांच्या अकादमीला या मैदानाचा कारभार या निमित्ताने सोपविला जाणार आहे. प्रशिक्षणाची सुरुवात झाल्यावर काही महिन्यांनी हे क्रिकेट मैदान पनवेलची ओळख बनेल. या मैदानावर आंतरराष्ट्रीय सीझन क्रिकेट प्रशिक्षणाचे धडे मुलांना दिले जातील. पालिका क्षेत्रातील ५०, रायगड जिल्हा व राज्यातील प्रत्येकी २५ अशा शंभर विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी क्रिकेटचे मोफत प्रशिक्षण येथून घेता येईल.

पनवेलमधील पालिकेच्या दि. बा. पाटील विद्यासंकुलामध्ये पालिकेने स्मरणिकेचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाईल. पालिकेने शहर स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपयांची विविध वाहने खरेदी केली आहेत. त्यांचे सुद्धा लोकार्पण या कार्यक्रमात केले जाईल. तारांगण यासारख्या प्रकल्पाचे सुद्धा लोकार्पण केले जाईल.

ॲपचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेने नवीन विकसित केलेल्या एका ॲपचे लोकार्पण होणार असून नागरिकांना या एका ॲपमधून अनेक पालिकेच्या सेवा घरबसल्या हाताळता येणार आहेत. या सेवा अशा – तक्रार करणे व त्यावर पालिकेने केलेली कार्यवाहीची दखल, मालमत्ता कराचा भऱणा, महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या सुविधा, गुलाबी रिक्षाच्या माध्यमातून पनवेलमधील महिलांना उद्योगाची संधी.

Story img Loader