पनवेल : पनवेल शहरात सद्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. घरातील नळ पाण्याविना कोरडे पडले असल्याने सध्या पनवेलकर आपली तहान बाटलीबंद पाण्यावर भागवत आहेत. तर इतर वापारासाठी टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहरात गेल्या नऊ दिवसांत ६०९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत पनवेलकरांना ७३ लाख लिटर पाणी हे टॅंकरने पुरवावे लागत आहे. यावरून शहरातील पाण्याची किती गंभीर परिस्थिती आहे हे दिसून येते. याच टँकरमधील पाणीपुरवठ्यामुळे काही दिवसांपूर्वी वसतीगृहातील ११ मुलींना डायरिया झाला होता. यावरून पनवेलकरांच्या आरोग्याचा प्रश्नही किती गंभीर आहे हे लक्षात येते. असे असतानाही शहरासाठी काम सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामाची संथगती पाहता पनवेलकर संताप व्यक्त करीत आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असताना पनवेल शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी मोर्चा व आंदोलन केले नाही. पाणीटंचाईला काटकसरीने सामोरे जाणे पनवेलकरांनी पसंद केले आहे.

मात्र सद्यस्थितीत पनवेलमध्ये पाणी प्रश्न बिकट आहे. पनवेल महापालिका ज्या सोसायटीत पाणी नाही त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करीत आहे. मात्र हे पाणी पिण्यासाठी वापरणे म्हणजे आजाराला आमंत्रण अशी वेळ आल्याने पदरमोड करीत बाटलीबंद पाणी घ्यावे लागत आहे. पनवेलमध्ये बाटलीबंद पाण्याचा खप तीस टक्यांनी वाढल्याचे येथील एका व्यावसायिकाने सांगितले. तर पाणी तुटवडा असल्याने नागिरक जेवणासाठी पत्रावळी, पिण्याच्या पाण्यासाठी कागदी ग्लासचा वापर करीत आहेत. यासाठीही पदरमोड करावी लागत आहे.

Story img Loader