सुधाकर शिंदे यांच्या रोजच्या उपस्थितीमुळे पनवेलमधील फेरीवाले, व्यापाऱ्यांची पंचाईत
१ ऑक्टोबरला पदभार स्वीकारल्यापासून एकही सुटी न घेतलेले पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे कधी सुटी घेणार, याविषयी पनवेलमध्ये उत्सुकता आहे. कारावाईचा धडाका लावणारे शिंदे सुटीवर कधी जातात याची वाट फेरीवाले, व्यापारी आणि अतिक्रमण करणारे पाहत आहेत, तर सर्वसामान्य पनवेलकर शिंदे यांच्या कामाचा वेग पाहून थक्क झाले आहेत. आयुक्तांना याबाबत विचारल्यावर त्यांनी सुटी घेतली नसल्याचे कबूल केले. मात्र येत्या काळात दीर्घ सुटी घेण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पनवेल शहर सुंदर बनविण्यासाठी आयुक्त शिंदे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवायांमुळे १ ऑक्टोबरपूर्वीचे पनवेल शहर आणि दोन महिन्यांनंतरचे पनवेल शहर यात मोठे अंतर निर्माण झाले आहे. जी गटारे सफाईसाठी कधीच उघडली गेली नव्हती ती उघडून स्वच्छ केली जात आहेत. जे पदपथ कधीच मोकळे नव्हते, तिथे अतिक्रमणांवर दिवसरात्र जोरदार कारवाई होत आहे. फेरीवाले आणि अतिक्रमणांनी व्यापलेले शहरातील रस्ते आज मोकळे व विस्तीर्ण झाले आहेत. फेरीवालामुक्त शहर आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य पनवेलकर आयुक्तांच्या या कारवाईचे स्वागत करत आहेत. व्यापारी दुकानासमोरील मार्जिनल स्पेस मर्जीप्रमाणे वापरत होते. त्यावरही आता अंकुश आला आहे. उरणफाटा येथील मासळी बाजारात मटण बाजार उभारण्याचा आयुक्तांचा मानस आहे. सध्या पनवेलमध्ये रस्त्यांत अडथळा ठरणाऱ्या देवालयांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया आयुक्तांनी सुरू केली असून त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले.
मुलांना सांभाळत कारवाई
आयुक्त सुधाकर शिंदे यांना दोन लहान मुले आहेत. शनिवार-रविवारीही काम करणारे आयुक्त आठवडय़ातील दोन दिवस स्वत मुलांना सांभाळतात. या दोन दिवशी ते मुलांना सोबत घेऊनच कारवाई करतात. आयुक्त अतिक्रमणे दूर करण्यात मग्न असताना मुले त्यांच्या गाडीत बसून ते करत असलेले काम पाहतात. कधी कधी ही मुले जवळपासच्या एखाद्या बागेत खेळत असतात.