प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर
शाळा नाही, शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी बस नाही, पिण्यासाठी पाणी नाही आणि मोकळा श्वास घेण्यासाठी शुद्ध हवाही नाही.. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १मधील बहुतेक गावे अशा अनेक अभावांनी ग्रासलेली आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या नंतर सोडवा आधी मुलांच्या शिक्षणापुरती तरी बससेवा सुरू करा, अशी या गावांतील रहिवाशांची मागणी आहे.
पनवेल परिसरातील गावे या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आसली, तरीही जिल्हा परिषद, पंचायत समिती व सिडकोला जे करता आले नाही, ते काम महापालिका करेल का, याविषयी येथील रहिवासी साशंक आहेत. मुंब्रा-पनवेल मार्गापासून सुमारे पाच किलोमीटर आत असलेल्या तुर्भे व पिसार्वे या गावांत आजही राज्य परिवहन मंडळाची बस येत नाही. धानसर गावातही हीच समस्या आहे. पिण्याच्या पाण्यापेक्षा येथे वाहतुकीची समस्या भीषण आहे. तुर्भे गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, मात्र त्यापुढील शिक्षणासाठी मुलांना रोजची पाच किलोमीटर पायपीट करून रोहिंजण गाठावे लागते. त्यामुळे किमान विद्यार्थ्यांसाठी तरी बससेवा सुरू करावी, अशी मागणी येथील रहिवासी रत्ना भोईर यांनी केली. त्यामुळे पालिकेने पिण्याच्या पाण्याच्या योजनेपूर्वी माध्यमिक शाळा सुरू करावी किंवा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या प्रभागातील आडिवली गावाच्या वेशीवर ठाणे जिल्ह्य़ातील दहिसर गावाची हद्द आहे. तिथे विविध टाकाऊ रसायने आणून जाळली जातात. त्यामुळे ग्रामस्थांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचे रहिवासी बळीराम पाटील यांनी सांगितले. गावात आजही चांगले रस्ते नाहीत, विंधणविहिरींच्या (बोअरवेल) पाण्यावर हे गाव अवलंबून आहे. पाणी खेचणाऱ्या मोटारींची स्पर्धाच लागलेली दिसते. येथे पालेभाज्या पिकवल्या जातात पण प्रदूषणाचा परिणाम शेतीवर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आडिवलीच्या हद्दीतील धानसर टोलनाक्यावर थेट शिळफाटा असा नामोल्लेख आहे. किमान टोलनाक्याला तरी आडिवलीचे नाव मिळाल्यास गावाच्या नावाची प्रसिद्धी होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धानसर गाव हे मुंब्रा-पनवेल महामार्गापासून सुमारे चार किलोमीटर दूर आहे. गावात जाणारा एकमेव रस्ता रुंद करून डांबरीकरण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गावातील पाण्याची व कचऱ्याची समस्या बिकट आहे. येथे अद्याप पालिकेची घंटागाडी येत नाही. गावात पूर्वी बससेवा सुरू होती, मात्र अपुऱ्या प्रवाशांचे कारण देऊन बंद करण्यात आली.
आडिवलीच्या अस्तित्वाचा प्रश्न
प्रभाग १ मधील उत्तरेकडील आडिवली गावाची समस्या ही स्वत:च्या अस्तित्वासाठी आहे. या गावाला कागदोपत्री आडिवली म्हणून ओळख असली तरी प्रत्यक्षात या गावाला किरवली या नावाने ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी या परिसरातील विमान पडल्याची दुर्घटना त्याला कारणीभूत आहे. विमान दुर्घटनेनंतर काही नागरिकांचा मृत्यू झाला, मोठा आगडोंब झाला आणि किरवली गावांमधील नागरिक या गावात स्थलांतरित झाले. त्यानंतर या गावाला किरवली असेच नाव पडले. महसूल विभागाच्या दफ्तरी किरवली नाव असल्यामुळे कायदेशीर असणारे आडिवली बोलीभाषेत किरवली म्हणून प्रसिद्ध झाले. बसथांब्यापासून सर्वत्र किरवली अशीच ओळख बसवाहक व रिक्षाचालकांमध्ये कायम राहिली.
बाटलीबंद पाण्याशिवाय पर्याय नाही
तुर्भे गावातील काही ग्रामस्थ बाटलीबंद पाणी पितात. करवले बुद्रुक या गावात पाण्यासाठी शंभरफुटांपर्यंत खोदकाम केल्यास रसायनांचा दर्प असलेले पाणी लागते. करवलेप्रमाणे घोट गावातही प्रदूषण हीच मोठी समस्या आहे. औद्योगिक विकासामुळे गावांमध्ये आर्थिक संपन्नता आली असली, तरी प्रत्येक श्वासासोबत प्रदूषण शरीरावर हल्ला करत आहे. या गावातील नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न सध्या येथील तरुणांनी लावून धरला आहे. याच गावातील वारकरी सांप्रदायाने प्रदूषणाविरोधात आंदोलन पुकारले आहे. पेणधर गावात उंच इमारती बांधल्या जात आहेत. तिथे मेट्रो प्रकल्प येत आहे, तरीही औद्योगिक प्रदूषणाचा फटका या परिसराला बसण्याची शक्यता असल्याने येथील सदनिकांचा दर घसरला आहे. या गावातून दिवा-पनवेल लोहमार्ग जाणार आहे. नवीन रेल्वेस्थानकाचे नियोजन असल्यामुळे येथे विकास होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या येथे रुंद रस्तेही नाहीत.
प्रभागाच्या परिसराची माहिती
पालिकेच्या उत्तर टोकावरील अखेरचे गाव असलेल्या धानसरचा समावेश या प्रभागात आहे. त्यापुढे ठाणे जिल्ह्य़ाची हद्द सुरू होते. आडिवली, बीड या गावांचा समावेश पालिकेच्या या प्रभागात असला, तरी ती पनवेल परिसरापासून खूप दूर आहेत. तुर्भे, पिसार्वे आणि करवले बुद्रुक या गावांमध्ये केवळ जमिनीच्या दरांचा विकास झाला आहे. दक्षिणेकडील रोहिंजण गाव आहे, तर पूर्व बाजूला पेणधर, घोट व कोयनावेळे ही गावे आहेत.