लक्ष्मीपूजनाच्या रात्री कळंबोली वसाहतीतील एका सराफाचे दोन लाख रुपयांसाठी अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकले नाहीत. या सराफाचे नाव महेंद्र मारू असे असून अपहरणकर्त्यांनी त्यांना मारहाण करून बदलापूर येथे सोडून दिले होते. या घटनेमुळे व्यापारीवर्ग हादरून गेला आहे.
लक्ष्मीपूजनाची अमावास्या संपल्यानंतर रात्री बारा वाजता सराफ आपल्या चोपडय़ा व दागिन्यांची पूजा करतात. मयूरा ज्वेलर्सचे मालक मारू हेसुद्धा आपल्या दुकानातील साफसफाई करून घरी निघाले असता ही घटना घडली. ते रोडपाली नोड येथील सेक्टर २० येथे राहतात. तलावाजवळून ते दुचाकीवरून जात असताना त्यांना मागून मोठय़ा मोटारीने धक्का दिला. काही वेळानंतर मारू यांच्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांना मोटारीत डांबण्यात आले. मोटारीतील चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली.
त्यांनी विरोध केल्याने चाकूच्या साहाय्याने त्यांच्या मांडी, ओठ व जिभेवर वार करण्यात आले. चोरटय़ांनी त्यांच्याजवळील सहा हजार रुपये व त्यांचा मोबाइल फोन हिसकावला.
काही तासानंतर मारू यांना बदलापूर येथील एका पेट्रोल पंपाजवळ सोडण्यात आले. मारू यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर पेट्रोल पंपावरील काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मारू यांच्या नातेवाईकांना व कळंबोली पोलिसांना हा प्रकार समजला.

Story img Loader