पनवेल : सिडको मंडळाने एका विकसक कंपनीला खारफुटीच्या क्षेत्रात भूखंड वाटप केला होता. मात्र विकसकांच्या मागणीनंतरही सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून भूखंड इतर क्षेत्रात न दिल्याने विकसक कंपनीने सिडकोच्या एका दलालाची मदत घेतली. दलालाने या कामासाठी १३ लाख रुपये घेतले. मात्र अजूनही भूखंडाची जागा बदलून मिळत नाही आणि दिलेले पैसे सुद्धा परत मिळत नसल्याने विकसक कंपनीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

अहिल्या एंटरप्रायजेस कंपनीच्यावतीने ही तक्रार शांताराम खेडेकर यांनी नोंदवली आहे. आहिल्या इंटरप्रायजेस कंपनीकडे सिडको मंडळाचा खारफुटी क्षेत्रातील भूखंड आहे. परंतु खारफुटीतील भूखंडाचा विकास करणे तातडीने शक्य नसल्याने विकसक कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या संतोष भगत याने त्याचा भाऊ विनोद याची बेलापूर येथील सिडको भवनमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे सांगितले. मे २०२३ रोजी विनोद भगत सांनी अगोदर १० लाख रुपये नंतर ३ लाख रुपयांचा धनादेश अहिल्या एंटरप्रायजेस कंपनीकडून घेतला.

२२ महिने झाले तरी भूखंड बदलून मिळत नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळत नसल्याने खेडेकर यांनी अहिल्या एंटरप्रायजेस कंपनीच्यावतीने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला. अर्जाची चौकशी केल्यानंतर खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी विनोद भगत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.