पनवेल : कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या इमारतीमध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे (आर.टी.ओ.) कार्यालय सुरू आहे. हे कार्यालय काही दिवसांत स्थलांतरित होऊन खारघर येथील सेक्टर ३६ मधील व्हॅलीशिल्प सोसायटीच्या आठ गाळ्यांमध्ये सुरू होणार आहे. याबाबतच्या प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीचे आदेश राज्याच्या गृहविभागाने गुरुवारी जाहीर केले. एप्रिल महिन्यात पनवेल आरटीओ कार्यालय खारघर येथे प्रत्यक्षात स्थलांतरीत होईल असे संकेत मिळत आहेत.

कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार समितीच्या सामायिक इमारतीमध्ये मागील १४ वर्षांपासून आरटीओ कार्यालयाचा कारभार सुरू आहे. मात्र लोखंड पोलाद बाजार समितीची सामायिक इमारत पनवेल महापालिकेने धोकादायक घोषित केली होती. धोकादायक इमारतीमधून कामकाज सुरू असल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या इमारतीमधील अनेक सरकारी कार्यालये हलविण्यात आली. पनवेल आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पनवेल तहसिलदार, पनवेल महापालिका आणि सिडको मंडळाकडे जागेची मागणी करण्यात आली होती. सिडको मंडळाने आरटीओच्या मागणीला प्रतिसाद देत खारघर उपनगरातील सेक्टर ३६ येथील व्हॅली शिल्प को.ऑ.हौ.सोसायटीमधील इमारतीत जागा भाडेतत्वाने देण्याचा निर्णय घेतला.

पुढील आठवड्यात सोमवार ते मंगळवारी आरटीओ कार्यालयाकडून सिडको मंडळाला भाड्याच्या रकमेचा धनादेश दिल्यानंतर सिडकोसोबत भाडेकरार झाल्यावर आरटीओच्या ताब्यात हे गाळे येतील. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हक्काचे कार्यालय कधी?

पनवेल आरटीओ कार्यालयासाठी सिडको मंडळाने तळोजा मजकूर येथील पावणेतीन एकर क्षेत्राचा भूखंड दिला आहे. आरटीओ कार्यालयाने या जागेच्या मोबदल्यात विकास शुल्क देखील सिडको मंडळाकडे डिसेंबर महिन्यात जमा केले आहे. परंतु प्रत्यक्षात जागेवर विकसित भूखंडाऐवजी ती जागा उंचसखल आणि त्या जागेतील मोठा भागाला तलावाचे रुप आल्यामुळे सिडको मंडळाने हा भूखंड व्यवस्थित विकसित करुन देण्याची विनंती आरटीओने सिडकोकडे केली आहे. सिडकोने विकसित भूखंड दिल्यावर पनवेल आरटीओ कार्यालय हक्काच्या जागेत उभारण्याच्या कामाला वेग येईल.

Story img Loader