पनवेल : तालुक्यातील शिरढोण गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावरील महिंद्रा ट्रॅक्टर शोरुम शेजारी गुरुवारी सकाळी ९ वाजता ४६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली होती. मृत व्यक्तीचे नाव सुशांत कुमार कृष्णा दास असे आहे. सुशांतचा गळा चिरुन त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्या करणाऱ्या २० वर्षीय अमित रामक्षय राय याला अटक केली आहे. अमित व सुशांत एकाच हॉटेलमध्ये काम करत होते. अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून हत्या झाल्याचे अमितने पोलीसांना दिलेल्या जबाबात कबूल केले.
मृत सुशांत शिरढोण येथील साईप्रसाद हॉटेलमध्ये स्वयंपाकघराचा मुख्य पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. सुशांतच्या हत्येनंतर तो काम करत असलेल्या हॉटेल मधील सुशांतचे सहकारी कर्मचारी व इतरांची चौकशी पोलीसांनी गुरुवारी सकाळी सुरू केली. सुशांत हा शिरढोण गावातील धनाजी महाडिक यांच्या चाळीत राहत होता. सुशांतचा गळा चिरुन त्याची हत्या केल्याने परिसरात नेमके सुशांतचे वैरी कोण याबाबत चर्चा सुरू होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक पोलीसांसह नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग क्रमांक २ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश गवळी यांचे पोलीस पथक हत्या करणाऱ्यांच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी सुशांत ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्याच हॉटेलमधील सुशांतचा सहकारी अमितला ताब्यात घेतले. अमितच्या चौकशीअंती सूशांतच्या हत्येचा उलघडा झाला.
हेही वाचा…दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या जागा मालकाला अटक, विकासक अद्याप फरार; शोध सुरूच
सूशांत हा हॉटेलमध्ये जुना कामगार असल्याने इतर परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा त्यावर विश्वास होता. हे कामगार गावी पैसे पाठविण्यासाठी सूशांतला सांगत असत. सुशांत कामगारांचे पैसे ऑनलाईन पाठविल्यानंतर जादा शंभर ते दोनशे रुपये कामगारांकडून घेत असे. सुशांतकडे अमितने सुद्धा १० हजार रुपये गावी त्याच्या कुटूंबियांना पाठविण्यासाठी दिले होते. बुधवारी अमितने दिलेल्या बँकखात्यावर ती रक्कम सुशांतने पाठविली होती. मात्र वरील २०० रुपये सुशांत अमितकडे मागत होता. यावर अमित व सुशांत यांच्यात वाद सूरु होते. रात्री अमित व सूशांत हे हॉटेलचे काम संपवून घरी जात असताना याच दोनशे रुपयांच्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले. अमितजवळच्या पिशवीत त्यावेळी चाकू होता. अमित व सुशांत यांच्यात झटापटी झाली. त्यावेळी रागाच्या भरात अमितने त्याच्याजवळील चाकूने सुशांतच्या गळ्यावर वार केल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले. अमितला पनवेल येथील न्यायालयात पोलीसांनी हजर केले आहे.