पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असणा-या देवीचापाडा गावात राहणारी दोन वर्षांची बालिका मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. तीच्या पालकांनी यासंदर्भातील तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. बुधवारी रात्री घरातील पोटमाळ्यावरुन दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यावर एका पेटीमध्ये बेपत्ता बालिकेचा मृतदेह सापडला. यामुळे देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ माजली.अद्याप बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.
देवीचा पाडा येथील विनायक मेडिकल जवळील माऊली कृपा इमारतीच्या तीस-या मजल्यावर पीडित मुलीचे कुटुंब राहत होते. मंगळवारी बालिकेच्या पालकांनी तळोजा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीमध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता बालिका बेपत्ता झाल्याचे म्हटले. संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पावणेपाच वाजले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ज्या इमारतीमध्ये हे कुटूंब राहतात त्याच्याजवळ त्यांचे काही नातेवाईक सुद्धा राहतात. या घटनेनंतर नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी घटनास्थळी गुरुवारी भेट दिली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित कुटुंबियांच्या संपर्कात मंगळवार ते बुधवारी आलेल्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.