पनवेल : कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ५ ई येथे सिडको मंडळाकडून समाज मंदिराच्या इमारतीमधील करोना साथरोग रुग्णालयाचे हस्तांतरण झाल्यावर पनवेल महापालिकेने ही इमारत पाडून पुन्हा नव्याने रुग्णालयासाठी इमारत बांधण्याचा निर्णय पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला. इमारत उभारणीसाठी सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांचा खर्च आणि या रुग्णालयातील वैद्याकीय साहित्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २७ कोटी रुपये खर्च करून पनवेल महापालिका कळंबोली येथे पालिकेचे पहिले ५० खाटांचे साथरोग रुग्णालय येथे सुरू करणार आहे.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ५ ई मधील मुख्य चौकात १५ गुंठे क्षेत्रावर समाज मंदिराचे नियोजन सिडको मंडळाने केले होते. या तीन मजली इमारतीला बांधून ३० वर्षांहून अधिकचा काळ झाल्याने या इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळू लागले होते. करोना साथरोग काळात सिडको मंडळाने याच समाज मंदिराच्या इमारतीची डागडुजी करून येथे ५८ खाटांचे करोना साथरोग रुग्णालय सुरू केले.करोना साथरोगानंतर या इमारतीचा वापर पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने करावा यासाठी समाजमंदिराची ही इमारत पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून पालिका प्रशासकांचा काळ असल्याने या इमारतीमध्ये साथरोग रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र पनवेल पालिकेने या इमारतीचे संरचना सर्वेक्षण केल्यावर या इमारतीच्या डागडुजीमध्ये भूकंप प्रतिरोधक यंत्रणेचा समावेश करावा लागणार आहे.
हेही वाचा >>>नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
कळंबोली येथील सेक्टर ५ ई मधील तात्पुरते रुग्णालयाची इमारतीचे सर्वेक्षण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम करण्याबाबत सुचविले होते. १९८४ साली ही इमारत बांधल्यामुळे जुन्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी या इमारतीचे पुनर्बांधकाम हाती घेतल्यास इमारत आणखी ३० वर्षे वापरात येऊ शकते अशी सूचना आयुक्तांकडून आल्यामुळे त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.- संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महापालिका